‘एफआरपी’ ३ हजार करा
By Admin | Updated: June 29, 2014 00:49 IST2014-06-29T00:44:02+5:302014-06-29T00:49:52+5:30
राजू शेट्टी यांची मागणी : ‘स्वाभिमानी’च्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक

‘एफआरपी’ ३ हजार करा
मुंबई / कोल्हापूर : आगामी गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाची ‘एफआरपी’ तीन हजार रुपये करावी, अशी मागणी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडे करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. खोपोली (ता. रायगड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. लोकशाही आघाडी सरकारच्या धोरणामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस येतील, असा विश्वास व्यक्त करत धान्याच्या आधारभूत किमतीत वाढ कमी केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
गेली दोन दिवस खोपोली येथे ‘स्वाभिमानी’च्या कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. यामध्ये जिल्हानिहाय संघटनेच्या कामाचा आढावा घेतला. केंद्रसरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत, याची माहिती खा. शेट्टी यांनी कार्यकर्त्यांकडून घेतली. महागाईचा परिणाम थेट शेतीवर होत आहे. खते, बियाणे, मशागतीचा खर्च वाढत आहे. उत्पादनाचा खर्च वाढल्याने शेतकरी अडचणीत आहेत. आगामी गळीत हंगामात उसाची ‘एफआरपी’ तीन हजार करण्याची मागणी शेट्टी यांनी केली.
सांगता समारंभासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे उपस्थित होते. ‘स्वाभिमानी’ला महायुतीत आणण्यात गोपीनाथ मुंडे यांचे योगदान मोठे होते. त्यांची उणीव जाणवू देणार नसल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले. सांगली येथील ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीची किंमत मंत्री पतंगराव कदम यांना मोजावी लागणार असून, या प्रकरणात महायुती ‘स्वाभिमानी’च्या पाठीशी असल्याचेही तावडे यांनी सांगितले. पृथ्वीराज जाचक, सतीश काकडे, सदाभाऊ खोत, दशरथ सावंत, प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे, अनिल मादनाईक, उल्हास पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)