उन्हाच्या चटक्याला फळांचा थंडावा
By Admin | Updated: February 23, 2015 00:16 IST2015-02-22T23:47:38+5:302015-02-23T00:16:41+5:30
आठवडी बाजार : कलिंगड, द्राक्षांची आवक वाढली; भाजीपाला स्थिर; हापूस हजार रुपये डझन

उन्हाच्या चटक्याला फळांचा थंडावा
कोल्हापूर : उन्हाची तीव्रता वाढत निघाल्याने कलिंगडे, द्राक्षांच्या मागणीबरोबर आवकही वाढली आहे. कडधान्य मार्केटमध्ये तूरडाळ व हरभरा डाळींच्या दरांत कमालीची वाढ झाली आहे. भाजीपाल्याचे दर गेल्या आठवड्यांच्या तुलनेत स्थिर असून, तुलनात्मक फळांच्या दरांतही फारशी चढउतार पाहावयास मिळत नाही. गेले आठ-दहा दिवस उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. परिणामी गेले तीन महिने थंड असणाऱ्या फळ मार्केटमध्ये काहीशी तेजी आलेली आहे. बेळगाव, कारवार, बंगलोर येथून कलिंगडांची आवक होऊ लागली आहे. स्थानिक कलिंगडांची आवकही सुरू असून, अजून तमिळनाडू येथून कलिंगडांची आवक होत नसल्याने दर अजूनही स्थिर आहेत. काळी पाठ असलेले ‘किरण,’ हिरवे पट्टे असलेले ‘नामधारी,’ तर आकाराने लहान असलेल्या ‘शुगरबेबी’ कलिंगडांचे ढीग आपणाला बाजारात पाहावयास मिळत आहेत. द्राक्षांची आवक वाढली असली तरी दरात घसरण झाली आहे. टरबुजांची आवकही वाढली आहे. तूरडाळीच्या दरात किलोमागे तब्बल १२ रुपये, तर हरभरा डाळीच्या दरात आठ रुपयांची वाढ झालेली आहे. साखर, सरकी तेल, खोबरे यांसह इतर दर स्थिर आहेत. स्थानिक भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. वरणा, गवार वगळता इतर भाज्यांचे दर गेल्या आठवड्यांच्या तुलनेत कायम आहेत. किरकोळ बाजारात मेथी, कोथिंबीर, पालक व पोकळा पेंढी पाच रुपये राहिली आहे.
हापूस हजार रुपये डझन!
गेले दोन आठवडे बाजारात देवगड व मालवण हापूस आंब्यांची आवक सुरू आहे. आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. किरकोळ बाजारात एक हजार रुपये डझनाचा दर राहिल्याने अजून तरी हापूस आंबा सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
गुळाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील बहुतांश गुऱ्हाळघरे बंद झाल्याने आवक कमी झाली आहे. परिणामी गूळ तेजीत आहे. प्रतिक्विंटल ३,६५० रुपये दर आहे.
गवार पुन्हा कडाडली
गेल्या दोन महिन्यांत गवारीच्या दरात कमालीचा चढउतार झालेला आहे. १०० रुपये किलोंपर्यंत दर पोहोचला होता. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात ४० रुपये किलो असणाऱ्या गवारीने पुन्हा सत्तरी गाठली आहे.
कांदा, बटाटा स्थिर
गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा व बटाट्याच्या आवकेबरोबर दरही स्थिर राहिला आहे. घाऊक बाजारात कांदा १४ रुपये, तर बटाटा १० रुपये किलो दर राहिला आहे.