आघाडीत ‘संशयकल्लोळ’ --
By Admin | Updated: August 1, 2014 23:27 IST2014-08-01T23:14:25+5:302014-08-01T23:27:24+5:30
पाडापाडीचे राजकारण : ‘ए. वाय.’ यांचे वक्तव्य काँग्रेसच्या संशयाला बळ देणारे

आघाडीत ‘संशयकल्लोळ’ --
राजाराम लोंढे - कोल्हापूर [ एस. टी. महामंडळाचे संचालक ए. वाय. पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने कॉँग्रेसला राष्ट्रवादीवरील संशयाला बळ मिळाले आहे. यामुळे आघाडीवर परिणाम होईल, हे म्हणणे धाडसाचे होणार असले तरी आगामी निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण जोरात होणार, हे मात्र निश्चित आहे.
करवीर तालुक्यातील परिते येथील एका कार्यक्रमात एस. टी. महामंडळाचे संचालक ए. वाय. पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने गेली आठ दिवस करवीर व राधानगरी तालुक्यांतील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. ‘ए. वाय.’ यांचे वक्तव्य निमित्त आहे, गेली दहा वर्षे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवर थेट हल्ला चढवत आहेत. त्याला कारणेही तशीच आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मनापासून पाटील यांना साथ दिली नाही. तरीही लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी सर्वप्रथम आपली भूमिका जाहीर करत धनंजय महाडिक यांना पाठिंबा दिला. केवळ पाठिंबा दिला नाही तर पूर्ण ताकदीने त्यांच्या विजयासाठी कंबर कसली. लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर लगेच राष्ट्रवादीने भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक जाहीर करून कॉँग्रेसला डिवचले. आघाडीचा धर्म म्हणून प्रत्येकवेळी कॉँग्रेसने प्रामाणिक राहायचे आणि राष्ट्रवादीने सोयीचे राजकारण करायचे का? अशी विचारणा कॉँग्रेस कार्यकर्त्यांकडून होते. आघाडीच्या धर्माचा फायदा घ्यायचा आणि कॉँग्रेसला मदत करायच्या वेळी अंतर्गत विरोध करायचा, ही रणनीती राष्ट्रवादीची असल्याचा कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा रोष आहे. राष्ट्रवादीचे हे राजकारण जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी पक्षश्रेष्ठींच्या वारंवार कानावर घातले आहे. त्यामुळे लोकसभेसह विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी मागणी त्यांची आहे.
परिते येथील राष्ट्रवादीचे ‘भोगावती’चे संचालक कारंडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदार चंद्रदीप नरके, ए. वाय. पाटील व ‘शेकाप’चे नेते एकाच व्यासपीठावर आले. यामध्ये ए. वाय. पाटील यांनी आमदार नरके यांचे तोंड भरून कौतुक करत आगामी निवडणुकीला शुभेच्छा दिल्या. यामुळे पी. एन. पाटील आक्रमक झाले. त्यांनी ए. वाय. पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांनाच टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. या वादामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर फारसा परिणाम होणार नसला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण जोरात होणार हे मात्र निश्चित आहे.
ए. वाय. पाटील यांनी केलेले वक्तव्य हे सभेतील चांगुलपणा आहे. त्या गावातील युतीचा संदर्भ घेऊन ते सहज बोलून गेल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार के. पी. पाटील यांनी सांगितले. कॉँग्रेस आमचा मोठा भाऊ आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता चुकला तर कान पकडण्याचा अधिकार त्यांना आहे. आमचा पक्ष छोटा आहे. कॉँग्रेस आमचा मोठा भाऊ आहे. त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार आहे. आमच्या स्थानिक बोलण्यावर
दिल्लीत ठरत नसते. कॉँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व आमचे नेते शरद पवार यांच्या पातळीवर सर्व निर्णय होत असल्याचेही त्यांनी
सांगितले.
लोकसभा निवडणुकीतील अजून शाईही वाळलेली नसताना राष्ट्रवादीचे नेते आमच्या विरोधकांना मदत करण्याची भाषा करीत आहेत. आजपर्यंत आम्ही प्रामाणिकपणे आघाडीच्या निष्ठेतून मदत केली, पण आता निष्ठा आणि ताकदही राष्ट्रवादीला दाखवून देऊ, असा इशारा कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी दिला. परिते येथील कार्यक्रमात शिवसेनेच्या आमदारांना पाठिंबा देण्याची भाषा ए. वाय. पाटील यांनी केली. हे आता खपवून घेणार नाही. राधानगरी -भुदरगड मतदारसंघात आपणाला मानणारी ७५ हजार मते आहेत, याचा विसर राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांना काँग्रेसची ताकद दाखवून देऊ.
करवीर व राधानगरी तालुक्यांतील कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील वादाला भोगावती साखर कारखान्याच्या राजकारणाची किनार आहे. कॉँग्रेसचे पारंपरिक शत्रू ‘शेकाप’ व आमदार चंद्रदीप नरके यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादीने कारखान्यात सत्तांतर घडविले. हे कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील वादाचे मुख्य कारण आहे.