शिरोळ तहसीलवर मोर्चा
By Admin | Updated: January 20, 2015 23:42 IST2015-01-20T21:31:14+5:302015-01-20T23:42:59+5:30
मुस्लिम आरक्षणाची मागणी : मुस्लिम हक्क संघर्ष समितीतर्फे आंदोलन

शिरोळ तहसीलवर मोर्चा
शिरोळ : मुस्लिम समाजास आरक्षण मिळावे, मुस्लिम अत्याचार विरोधी कायदा व्हावा, या प्रमुख मागणीसाठी मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्यावतीने आज, मंगळवारी मोटारसायकल रॅलीसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार सचिन गिरी यांना निवेदन देण्यात आले. शासनाने २६ जानेवारीपूर्वी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी; अन्यथा समाजाच्यावतीने २६ जानेवारीपासून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्यावतीने कुरुंदवाड येथून मोटारसायकल रॅली निघाली. येथील शिवाजी चौकात रॅलीचे आगमन होताच शिष्टमंडळाच्यावतीने दलितमित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसील कार्यालयावर आला. ‘मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, अशा घोषणा आंदोलक देत होते. तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी समितीचे अध्यक्ष अस्लम मुल्ला, अनिलराव यादव, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर सकट, संतोष कांबळे, इकबाल बैरागदार, डॉ. एम. जी. बागवान, राजेखान नदाफ, फरीद मुजावर यावेळी यांची भाषणे झाली. मुस्लिम समाज आर्थिक व विशेषत: शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक व सरकारी नोकरीत आरक्षण मिळावे. मुस्लिम समाजाला दिलेले पाच टक्के आरक्षण कायम ठेवावे, अशा मागण्या करण्यात आल्या. तहसीलदार गिरी यांनी निवेदन स्वीकारून शासनाला आपल्या भावना त्वरीत कळवू, असे आश्वासन दिले. या आंदोलनात आजमपाशा पटेल, अनिश चौगुले, दिलीप हेगडे, अस्पाक मुजावर, मुन्नाभाई नदाफ, यांच्यासह मुस्लिम समाज व दलित चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)