इचलकरंजी पालिकेवर मोर्चा
By Admin | Updated: April 22, 2016 00:53 IST2016-04-22T00:36:57+5:302016-04-22T00:53:02+5:30
नागरी सुविधांची मागणी : नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

इचलकरंजी पालिकेवर मोर्चा
इचलकरंजी : जवाहरनगरमधील फकीर मळा परिसरात रस्ते, गटारी, दिवाबत्ती आणि नळ पाणी अशा मूलभूत सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी त्या परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन केले. त्या परिसरामध्ये कूपनलिका खोदून पिण्याच्या पाण्याची सोय ताबडतोब करण्यात येईल व अन्य सुविधा लवकरात लवकर पूर्ण करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिल्यानंतर हे आंदोलन संपुष्टात आले.
जवाहरनगरमधील हनुमाननगर आणि फकीर मळा येथील प्रत्येकी चार गल्ल्यांमध्ये अनुक्रमे भुयारी गटार योजनेबरोबरच रस्ते, गटारी, दिवाबत्ती आणि पाण्याचे नळ ताबडतोब मिळावेत, या मागणीसाठी सुमारे चारशेहून अधिक महिला व पुरुषांनी पालिकेवर मोर्चा काढला होता. राजू बोंद्रे व संतोष कांदेकर यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा पालिकेमध्ये येताच तेथील प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सुमारे दीड तासाच्या आंदोलनानंतर नगराध्यक्षा बिरंजे व मुख्याधिकारी रसाळ मोर्चाला सामोरे गेले.
यावेळी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या बोंद्रे व कांदेकर यांनी मांडल्या. यावर मुख्याधिकारी डॉ. रसाळ म्हणाले, फकीर मळा परिसरामधील रस्त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचे काम लवकरात लवकर केले जाईल. तसेच नजीकच्या एक ते दोन आठवड्यांच्या काळात कूपनलिका खोदून नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर करू. यावेळी उपनगराध्यक्ष महावीर जैन, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ, नगरसेविका बिस्मिल्ला मुजावर, नगरसेवक रवी रजपुते, शशांक बावचकर, जलअभियंता ए. एन. जकीनकर, अभियंता संजय बागडे, नगररचना अधिकारी बबन खोत, कामगार अधिकारी विजय राजापुरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तथाकथित नेत्यांना नगराध्यक्षांचा टोला
आंदोलनकर्त्यांसमोर भाषण करताना फकीर मळा परिसरातील सेवा-सुविधा सहानुभूतीने नागरिकांना पुरविल्या जातील, असे सांगत नगराध्यक्षा बिरंजे म्हणाल्या, निवडणुका जवळ आल्यामुळे जागे झालेल्या तथाकथित नेत्यांनी मोर्चेबाजी न करता पालिकेतील कामकाजातील तांत्रिक बाजू समजावून घ्याव्यात. आपणच आपल्या समस्यांची सोडवणूक करावयाची आहे. निव्वळ टीकात्मक घोषणाबाजीने कामे होत नाहीत.