मुख्यमंत्र्यांसमोर ‘स्वाभिमानी’ला चिमटे
By Admin | Updated: February 17, 2017 00:42 IST2017-02-17T00:42:19+5:302017-02-17T00:42:19+5:30
कोरोची प्रचार सभा : हाळवणकरांनी घेतले ‘एफआरपी’चे श्रेय; धैर्यशील माने यांनी काढली सदाभाऊंची आठवण

मुख्यमंत्र्यांसमोर ‘स्वाभिमानी’ला चिमटे
कोल्हापूर : राज्यातील भाजप सरकारने गावविकासाचा स्वतंत्र आराखडा तयार करावा. महापालिकेत जसे टाऊन प्लॅनिंग होते तसेच ग्रामपंचायतीलाही घरबांधणीची परवानगी ‘टीपी’कडूनच दिली पाहिजे असे धोरण निश्चित केले जावे, अशी अपेक्षा माजी मंत्री विनय कोरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांकडे केली. या सभेत आमदार सुरेश हाळवणकर यांनी कोणतेही आंदोलन न करता सरकारमुळेच शेतकऱ्यांना एफआरपी मिळू शकली, असे सांगत ‘स्वाभिमानी’चा चिमटा घेतला, तर व्यासपीठाकडे पाहत धैर्यशील माने यांनी ‘सदाभाऊ कुठे आहेत...’अशी खपली काढली.
कोरोची येथे भाजप व मित्रपक्षांच्या प्रचारासाठी आयोजित मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जंगी सभा झाली. या सभेत विनय कोरे म्हणाले, ‘आता गावांच्या विकासाचे कोणतेही धोरण नाही. ग्रामपंचायतींकडे तसा आराखडा करण्याची दूरदृष्टी नाही. त्यामुळे गावे कशीही उभी-आडवी विस्तारली आहेत. या गावांचा आॅस्ट्रेलियात राबविली तशी ‘रूरल वेटेज योजना’ राबवून स्वयंपूर्ण विकासाचा आराखडा निश्चित केला पाहिजे. सरकारने सत्तेइतकेच या कामालाही प्राधान्य द्यावे.
कोल्हापूरला राज्य सरकारने हजारो कोटींचा निधी दिला आहे. त्याची उतराई म्हणून जनतेने भाजपच्या हातात सत्ता द्यावी, असे आवाहन आमदार हाळवणकर यांनी केले. विकास हाच केंद्रबिंदू मानून भाजपचे सरकार काम करत असल्याचे शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी सांगितले. हिंदुराव शेळके यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी अनिता चौगले, वृषभ जैन, अशोक स्वामी यांची भाषणे झाली. पी. डी. पाटील यांनी आभार मानले. पंचगंगा साखर कारखान्याच्या माळावर झालेल्या या सभेला स्वरुप महाडिक, सुरेश पाटील, परशराम तावरे, अनिल यादव, पी. जी. शिंदे, रणजित पाटील, अरुण इंगवले, प्रकाश शहापूरकर, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, जयसिंगपूरच्या नीता माने, शौमिका महाडिक आदी उपस्थित होते.
‘नारळा’चीही आठवण ठेवा..
व्यासपीठावरील बहुतेकांच्या भाषणात ‘कमळाला विजयी करा,’ असा उल्लेख होता. त्याची दखल घेऊन जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी ‘नुसते कमळ..कमळ म्हणू नका, नारळाचीही आठवण ठेवा,’ असे आमदार हाळवणकर यांना सुचविले. शिवसेनेचे आमदार सुजित मिणचेकर यांनी आमदार असूनही मतदारसंघात तमाशा पार्टी सुरू केल्याची टीका करीत आवळे यांनी ते म्हणजे लोकप्रतिनिधी पदाला कलंक असल्याचे सांगितले.
‘जनसुराज्य’चा वाटा मोठा
कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता येणार हे स्पष्टच आहे; परंतु त्यामध्ये सर्वांत मोठा वाटा जनसुराज्य पक्षाचा असेल, असे कोरे यांनी सांगून टाकले.
मी राष्ट्रवादीचाच..
धैर्यशील माने यांनी मी राष्ट्रवादीचाच असून विकासाच्या मुद्द्यावर भाजपच्या आघाडीत असल्याचे सांगितले. हातकणंगले तालुक्याने ताकद दिली तर सत्ता कुणाची आणायची हे हा तालुका ठरवू शकतो. भाजप आघाडीतील मित्रपक्षांची वेगवेगळी चिन्हे असली तरी दत्तासारखे रूप एकच आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून दादांचे कौतुक..
कोल्हापूर जिल्ह्यात एक काळ असा होता की, या जिल्ह्यात कधी कमळ फुलेल असे वाटले नव्हते; परंतु पालकमंत्री चंद्रकांतदादा यांनी प्रयत्न केल्यामुळे जिल्ह्याचे राजकारण आता बदलले आहे. ही परिवर्तनाची नांदी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी दादांचे कौतुक केले. समरजित घाटगे यांनीही सर्व जागा स्वबळावर लढविल्याची दखल मुख्यमंत्र्यांनी भाषणात घेतली.
खंडपीठ बेदखल
हाळवणकर यांनी या सभेत खंडपीठासह पंचगंगा प्रदूषण, यंत्रमाग उद्योगाला सवलत आणि सिंचनासाठी दहा कोटी रुपये उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली. शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी शेती वीजपुरवठ्याचे फिडर सोलरवर चालविण्याचा पथदर्शी प्रयोग करण्यात येत असल्याचे सांगितले.
कोरेंची वेळ चुकली, मुख्यमंत्री न भेटताच गेलेकोल्हापूर : कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी विमानतळावर पोहोचण्यास काही मिनिटांचा उशीर झाल्यामुळे माजी मंत्री विनय कोरे यांचा काहीसा भ्रमनिरास झाला. कोरेंची विमानतळावर पोहोचण्याची वेळ चुकली अन् मुख्यमंत्री फडणवीस-कोरे यांची भेट व चर्चाही हुकली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला भाजपचे महानगर अध्यक्ष वगळता कोरेच एकमेव गेले होते.
हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील जाहीर प्रचार सभा आटोपून मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापुरातील उजळाईवाडी विमानतळावर हेलिकॉप्टरने पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासमवेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील होते. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर ४ वाजून २५ मिनिटांनी उजळाईवाडी विमानतळावर उतरले. माजी मंत्री विनय कोरे हे कोरोची येथील सभेस उपस्थित होते. सभा संपल्यानंतर ते स्वत:च्या कारमधून उजळाईवाडी विमानतळावर पोहोचले. तोपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टरमधून उतरून विशेष विमानात बसले. कोरे धावपट्टीकडे गेले अन् विमान सुरू झाले.
थोडक्यात वेळ चुकल्याने कोरे यांना मुख्यमंत्र्यांची वैयक्तिक भेट घेऊन बोलण्याची संधी हुकली. कोरे यांना काही तरी बोलायचे होते. त्यामुळे ते घाईगडबडीने विमानतळावर पोहोचले, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.