भेदरलेली तरुणी अन् भयभीत कुटुंबीय..
By Admin | Updated: July 21, 2014 00:40 IST2014-07-21T00:30:41+5:302014-07-21T00:40:57+5:30
आॅन दि स्पॉट रिपोर्ट : ‘बसर्गे’तील बलात्कार प्रकरण.

भेदरलेली तरुणी अन् भयभीत कुटुंबीय..
राम मगदूम - गडहिंग्लज
विज्ञान शाखेच्या पदवीनंतर कायद्याची सनद घेऊन गरिबांची वकिली करण्याचे ध्येय उराशी बाळगून उच्च शिक्षणासाठी दररोज चार किलोमीटरची पायपीट करणाऱ्या तरुणीच्या स्वप्नांचा चुराडा झाला. आठवड्यापूर्वी तिच्यावर झालेल्या बलात्काराच्या धक्क्यातून ती अद्याप सावरलेली नाही. अजून ती भेदरलेलीच आहे. भयभीत कुटुंबीय आणि भेटायला येणाऱ्या सहानुभूतीदारांची गर्दी अशी विचित्र परिस्थिती तिच्या घरी आज, रविवारी पाहायला मिळाली.
बसर्गे (ता. गडहिंग्लज) हे गडहिंग्लजच्या पूर्वभागातील एक सधन, सुसंस्कृत आणि सामाजिक व राजकीयदृष्ट्या जागरूक असलेले पाच हजार लोकवस्तीचे गाव. अलीकडे काही कुटुंबे शेतवडीत घरे बांधून स्थिरस्थावर झाली आहेत. दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय गावातच आहे. बारावीसाठी हलकर्णीला, तर पदवीसाठी गावातील मुला-मुलींना गडहिंग्लजला जावे लागते.
शाळा-कॉलेजच्या मुलांसाठी बसगाड्यांची सुविधा आहे. मात्र, बस वेळेवर नसल्यामुळे बसर्गे-नौकुड मार्गावरील विद्यार्थ्यांना येणेचवंडी फाट्यापर्यंत पायपीट करावी लागते. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेच्या ‘दिव्या’तून तिने गडहिंग्लज येथील एका वरिष्ठ महाविद्यालयात बी.एस्सी. प्रथम वर्ष पदवीसाठी प्रवेश घेतला. तिच्याबरोबर शिकणारे आजूबाजूचे अन्य कुणी नसल्यामुळे ती एकटीच घरापासून ‘बस स्टॉप’पर्यंत ये-जा करायची. कदाचित, त्याचाच गैरफायदा घेऊन ‘पाळत’ ठेवलेल्या ‘नराधमा’ने तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याचा कयास आहे. त्याला त्वरित पकडा, फाशी द्या! अशी तिच्या कुटुंबीयांसह पंचक्रोशीतील जनतेची मागणी आहे.