कोरोना सेवेसंबंधी ६०० जणांना विविध कोर्सेसमधून मोफत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:34+5:302021-09-09T04:30:34+5:30
कोल्हापूर : मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शहर आणि जिल्ह्यातील ६०० जणांना मोफत पॅरामेडिकल प्रशिक्षण दिले जात ...

कोरोना सेवेसंबंधी ६०० जणांना विविध कोर्सेसमधून मोफत प्रशिक्षण
कोल्हापूर : मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शहर आणि जिल्ह्यातील ६०० जणांना मोफत पॅरामेडिकल प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण कोर्सचा कालावधी कमीत-कमी दोन ते सहा महिन्यांचा आहे. कोरोना आजाराच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही तयारी केली जात आहे.
डॉक्टर, नर्स शिवाय पॅरामेडिकल शिक्षण असणाऱ्या मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. कोरोना रुग्णावर उपचार करताना याची गरज तीव्रपणे जाणवत आहे. यामुळे महाआरोग्य कार्यक्रमांतून दहावी, बारावी आणि इतर शाखा किंवा काही तांत्रिक कोर्सेससाठी बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या इच्छुक ६०० जणांना प्रशिक्षण दिले जात आहे.
जनरल ड्युटी असिस्टंट, इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्डस् असिस्टंट, प्रधानमंत्री आरोग्य मित्र असे सात कोर्सेस राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पंचगंगा, सावित्रीबाई फुले, चंदगड ग्रामीण रुग्णालय, कदमवाडीत डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, सिद्धिविनायक नर्सिंग होम येथे शिकवले जात आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक रजनी मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत.
कोट
मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातून जिल्हयातील ६०० जणांना वैद्यकीय सेवेसंंबंधी मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधितांना वैद्यकीय क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत.
संजय माळी, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र.