अंधावर झाली मोफत नेत्ररोपण शस्त्रक्रिया
By Admin | Updated: October 6, 2014 22:34 IST2014-10-06T22:09:38+5:302014-10-06T22:34:19+5:30
१५ वे नेत्रदान : नेत्रदान चळवळीत पडले पुढचे पाऊल

अंधावर झाली मोफत नेत्ररोपण शस्त्रक्रिया
गडहिंग्लज : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामस्थांनी सामाजिक बांधीलकीतून सुरू केलेल्या नेत्रदान चळवळीचे आणखी एक पाऊल पुढे पडले. येथील नारायण बंडू पाटील (वय ४३) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. चळवळीतील हे १५ वे नेत्रदान ठरले. पाटील यांच्या नेत्रांचा उपयोग करीत खानापूर व बेळगाव येथील अंधावर मोफत नेत्ररोपण शस्त्रक्रिया झाली. यानिमित्ताने दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या नेत्रदान चळवळीने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.
नारायण पाटील यांचे निधन झाले. त्यांचे पुत्र रवींद्र यांच्यासह कुटुंबीयांनी पाटील यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. येथील अंकुर आय हॉस्पिटलच्या स्वाती लोखंडे यांच्यासह सहकाऱ्यांनी तातडीने नेत्रगोल काढण्याची प्रक्रिया पार पडली. यापूर्वी चळवळीअंतर्गत झालेल्या नेत्रदानातून मिळालेले नेत्रगोल सांगली येथील नेत्रपेढीला पाठविले जात होते. तेथील प्रतीक्षा यादीतील रुग्णांवर नेत्ररोपण शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. मात्र, नारायण पाटील यांचे मरणोत्तर नेत्रदान मिळाल्यानंतर डॉ. सदानंद पाटणे यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या (बेळगाव) डॉ. शुभांगी पाटील यांच्याशी संपर्क साधला. नेत्रगोल व आपल्याकडे तपासणी झालेले रुग्ण पाठवित असल्याचे सांगितले. पाटील यांनीही शस्त्रक्रियेसाठी सहकार्याचे आश्वासन दिले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉ. पाटील यांनी या रुग्णाची पुन्हा तपासणी केली. यातील खानापूर येथील रुग्णांवर नेत्ररोपण शस्त्रक्रिया करणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉ. पाटील यांनी खानापूर येथील अंधासह बेळगाव येथील एका रुग्णावर मोफत नेत्ररोपण शस्त्रक्रिया केली. चळवळीत मिळालेल्या नेत्रदानातून डॉ. पाटणे यांच्याकडे तपासणी झालेल्या रुग्णावर मोफत शस्त्रक्रियाही यशस्वी झाली. (प्रतिनिधी)
चळवळीअंतर्गत झालेल्या शिबिरात दुंडगे, करंबळी, चिंचेवाडी, महागाव येथील अंध रुग्णांची डॉ. पाटणे यांनी पुन्हा तपासणी केली. करंबळी, चिंचेवाडी व महागाव येथील रुग्णांना बेळगाव येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविले, तर डॉ. पाटणे यांच्याकडेच उपचार सुरू असणाऱ्या रुग्णालाही नेत्ररोपण शस्त्रक्रियेसाठी बेळगावला जाण्यास सांगितले.