कोरोना वाहकांचा रस्त्यावर मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:23 IST2021-05-10T04:23:57+5:302021-05-10T04:23:57+5:30
कोल्हापूर : कोरोना झालाय पण माहीतच नाही असे अनेक नागरिक शहरातील रस्त्यावर, बाजारपेठेत फिरत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास ...

कोरोना वाहकांचा रस्त्यावर मुक्त संचार
कोल्हापूर : कोरोना झालाय पण माहीतच नाही असे अनेक नागरिक शहरातील रस्त्यावर, बाजारपेठेत फिरत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास हातभार लागत आहे. महानगरपालिका आरोग्य विभागाने अशा नागरिकांना शोधण्याकरिता रॅपिड ॲन्टिजन चाचण्या करण्याची मोहीम उघडल्यामुळे काही प्रमाणात त्यांना अटकाव झाला आहे.
कोरोना विषाणू आपले रूप सतत पालटत आहे. सौम्य लक्षणे असलेले नागरिक स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत आहेत. कोणतीही लक्षणे नसलेली, पण त्यांना कोरोना झाला आहे असे नागरिक तर उघडपणे रस्त्यावर फिरत आहेत. कुटुंबात एकत्रित राहत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढत चालला आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिका अनेक उपाययोजना राबवित आहे. त्याला नागरिकांकडूनच प्रतिसाद मिळत नाही.
जीवनावश्यक वस्तू विकत आणण्यासाठी म्हणून नागरिक सकाळच्या सत्रात घराबाहेर पडतात, पण त्यांचा आपल्या आजूबाजूला कोरोना आहे याची जाणीव नसते. अशा गर्दीतील नागरिकांची जेव्हा रॅपिड ॲन्टिजन चाचण्या करण्यात येत आहेत. त्यातून छुपे कोरोना बाधित समोर येत आहेत.
रविवारी भवानी मंडप परिसरातील शेतकरी संघाजवळ पोलीस कर्मचारी व नागरिकांची ॲन्टिजन चाचणी करण्यात आली. यावेळी दहा नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहरात संचारबंदी आहे. परंतु अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरिक गर्दी करत आहेत. भवानी मंडप परिसरातील १०० नागरिकांची चाचणी करण्यात आली. यामध्ये ९० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर १० नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे या नागरिकांना माहीत नव्हते. त्यांना आपण बाधित आहोत हे लक्षात आल्यावर धक्काच बसला.