मोफत धान्य वाटप सुरू.. रेशन दुकानांसमोर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:24 IST2021-05-11T04:24:45+5:302021-05-11T04:24:45+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे गरीब नागरिकांना उपाशीपोटी राहावे लागू नये यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या मोफत धान्याचे वाटप रेशन दुकानांमधून ...

मोफत धान्य वाटप सुरू.. रेशन दुकानांसमोर गर्दी
कोल्हापूर : कोरोनामुळे गरीब नागरिकांना उपाशीपोटी राहावे लागू नये यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या मोफत धान्याचे वाटप रेशन दुकानांमधून सुरू झाले आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थींना प्रती शिधापत्रिका १० किलो तांदूळ व २५ किलो गहू व प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला २ किलो तांदूळ व ३ किलो गहू मोफत दिले जात आहे, तर राज्याकडून दिले जाणारे धान्य याआधीच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे.
देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये या संसर्गाचे थैमान सुरू आहे. राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. याकाळात गरीब, गरजू नागरिकांच्या जेवणाचा, उदरनिर्वाहाचा प्रश्न येऊ नये यासाठी राज्य शासनाने अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकांवरील मे महिन्याचे धान्य मोफत देण्याचे जाहीर केले होते. हे धान्य याआधीच रेशन दुकानांपर्यंत पोहोचले असून, त्यांचे वाटपदेखील सुरू झाले आहे. केंद्राकडून आलेल्या धान्याचे सध्या जिल्हा पुरवठा विभागाकडून रेशन दुकानांना वितरण सुरू आहे. जिल्ह्यातील ४० टक्के रेशन दुकानांपर्यंत धान्य पोहोचले आहे.
केंद्राच्या वतीने दोन महिन्यांचे धान्य मोफत दिले जाणार आहे. त्यामुळे मेसह जून महिन्यातदेखील नागरिकांना त्याचा लाभ मिळेल. राज्य शासनाने अजून जून महिन्याबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही.
----
जिल्ह्यातील लाभार्थी असे
अंत्योदयमधील शिधापत्रिका : ५३ हजार २२१, लाभार्थी संख्या : २ लाख ३८ हजार ३३६
प्राधान्यक्रममधील शिधापत्रिका : ५ लाख १२ हजार ०१७, लाभार्थी संख्या : २२ लाख ८९ हजार ७९८
--
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. यासह प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अतिरिक्त अन्नधान्य अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रत्येकी २ किलो तांदूळ व ३ किलो गहू मोफत वाटप करण्यात येत आहे.
दत्तात्रय कवितके
जिल्हा पुरवठा अधिकारी
--