बेवारस मृतांवर मोफत अंत्यसंस्कार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:41+5:302021-06-18T04:17:41+5:30
जयसिंगपूर : येथील नगरपालिका हद्दीतील अनाथ, निराधार, बेवारस, बेघर तसेच वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमातील मृतांच्यावर मोफत अंत्यसंस्कार करण्याची कोणतीच सोय ...

बेवारस मृतांवर मोफत अंत्यसंस्कार करा
जयसिंगपूर : येथील नगरपालिका हद्दीतील अनाथ, निराधार, बेवारस, बेघर तसेच वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमातील मृतांच्यावर मोफत अंत्यसंस्कार करण्याची कोणतीच सोय नाही. परिणामी अशा प्रेतांची हेळसांड होत आहे. त्यामुळे पालिकेकडून बेवारस मृतांच्यावर मोफत अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्यावतीने मुख्याधिकारी टिना गवळी यांना देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास बुधवारी (दि. २३) पालिकेसमोर जिवंत समाधी घेण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये बेवारस प्रेत अंत्यविधीच्या प्रतीक्षेत अनेक तास पडून राहत असल्याने अशा प्रेतांची विटंबना होत आहे. याची जबाबदारी नगरपालिकेने स्वीकारली पाहिजे. मात्र, पालिकेकडे अशी कोणतीच सोय नसल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा प्रेतांवर अंत्यविधी करावयाचा झाल्यास तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च येतो. मात्र, दुसरीकडे नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामपंचायतींकडून अंत्यविधीसाठी सर्वांनाच २०० ते ३०० रुपयांमध्ये अंत्यविधीसाठी लाकूड व शेणीची उपलब्धता करून दिली जाते. मात्र, अंकली टोलनाक्यावरील स्मशानभूमी प्रेतांचा बाजार केला जात आहे. त्यामुळे पालिकेने शहरवासीयांना पालिका हद्दीतच स्मशानभूमीचे शेड उभारावे. तसेच सर्वांनाच माफक दरात आणि अनाथ, निराधार, बेवारस मृतांवर मोफत अंत्यविधी करण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. याप्रसंगी गंगाराम सातपुते, संजय भोसले, राहुल पवार उपस्थित होते.
फोटो - १७०६२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे मुख्याधिकारी टिना गवळी यांना राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्यावतीने निवेदन देण्यात आले.