पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश शहरांत मोफत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:25 IST2021-05-09T04:25:42+5:302021-05-09T04:25:42+5:30
विश्वास पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाच्या काळात व एरव्हीही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत महापालिका व नगरपालिकांकडून मृतांवर ...

पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश शहरांत मोफत अंत्यसंस्कार
विश्वास पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाच्या काळात व एरव्हीही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत महापालिका व नगरपालिकांकडून मृतांवर मोफत अंत्यसंस्काराची सोय उपलब्ध करून दिली आहे. मोफत अंत्यसंस्काराचा मूळ पॅटर्न कोल्हापूर शहराचा घालून दिला आहे. त्याचे अनुकरण गेल्या काही वर्षांत अनेक शहरांत होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचा कहर माजला असताना मृत्यूंची संख्याही रोज वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मृतांवरील अंत्यसंस्काराची प्रमुख शहरात काय व्यवस्था आहे, हे ‘लोकमत’ने जाणून घेतले. त्यामध्ये दिलासा देणारे चित्र पुढे आले.
जन्म कुठेही व्हावा; परंतु अंत्यसंस्कारासाठी मात्र कोल्हापुरात यावे असे म्हटले जाते. कारण गेली अनेक वर्षे कोल्हापुरात मोफत अंत्यसंस्काराची सोय आहे. दीपक पोलादे या सामाजिक कार्यकर्त्याने ॲल्युमिनियमच्या कमी वजनाच्या २० तिरडी, फायबरच्या पिंडी, तांब्याचे कलश व एक टन रक्षा मावेल एवढ्या आकाराचे दोन ठिकाणी रक्षाकुंड दिले आहेत. पूर्वी तिरडीसाठी बांबू विकत आणावे लागत होते. त्यातून निसर्गाची हानी होते म्हणून तिरडीच्या वापरासाठी पोलादे यांनी प्रबोधनाची मोहीम राबवली व त्याला चांगले यश आले आहे. त्यामुळेच कोल्हापूरने मोफत अंत्यसंस्कारासह आता पर्यावरणपूरक रक्षाविसर्जनाचे पुढचे पाऊल टाकले आहे. कोल्हापूरसह, सांगली, सातारा, पुणे व पिंपरी-चिंचवडला मोफत अंत्यसंस्काराची सोय आहे. इस्लामपूर, कराड, रत्नागिरी नगरपालिकांसह इतरही काही नगरपालिका अंत्यसंस्कारासाठी पैसै आकारतात.
कोल्हापूर महापालिका :
अंत्यसंस्कार सेवा : मोफत
एकूण स्मशानभूमी : ०४
महिन्याला अंत्यसंस्कार : ३५०
सध्या कोविड मृत्तांवर मुख्यत : डिझेल दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार
महापालिकेचा वाषिर्क खर्च : ३५ लाख
सांगली-मिरज-कूपवाड महापालिका :
अंत्यसंस्कार सेवा : मोफत
एकूण स्मशानभूमी : ०५
महिन्याला अंत्यसंस्कार : २१०
कूपवाडला गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार
कोविड मृतांसाठी पंढरपूर रोडला स्वतंत्र स्मशानभूमी
महापालिकेचा वार्षिक खर्च : ६० लाख
इस्लामपूर नगरपालिका :
अंत्यसंस्कार सेवा : सशुल्क
एकूण स्मशानभूमी : ०१
महिन्याला अंत्यसंस्कार : ७६
विद्युत दाहिनीचे शुल्क : २१००
पारंपरिक अंत्यसंस्कार : नातेवाइकांनी स्वत: लाकूड-शेणीची व्यवस्था करायची.
नगरपालिकेचा वार्षिक खर्च : गरज पाहून तरतूद
सातारा नगरपालिका :
अंत्यसंस्कार सेवा : मोफत
एकूण स्मशानभूमी : ०२
महिन्याला अंत्यसंस्कार : १७५
महापालिकेचा वार्षिक खर्च : २५ लाख
नगरपालिकेच्या आवाहनानंतर १६८ लोकांनी कोविड मृताच्या अंत्यसंस्कारासाठी ३८०० रुपयांप्रमाणे पैसे स्वत:हून दिले.
सातारा पालिकेने आतापर्यंत १९०० कोविड मृतांवर केले अंत्यसंस्कार.
कराड नगरपालिका :
अंत्यसंस्कार सेवा : सशुल्क
एकूण स्मशानभूमी : ०१
महिन्याला अंत्यसंस्कार : ८०
नगरपालिकेचा वार्षिक खर्च : तरतूद नाही
शहराबाहेरील कोविड मृतांच्या नातेवाइकांकडून ५५०० व दफनसाठी १०५०० शुल्क
इतरवेळी : नातेवाइकांनी अंत्यसंस्काराचा खर्च स्वत:च करायचा.
पुणे महापालिका :
अंत्यसंस्कार सेवा : मोफत
एकूण स्मशानभूमी : १० त्याशिवाय विद्युत ११ व गॅस दाहिन्या : १३
महिन्याला होणारे अंत्यसंस्कार : १७०० पर्यंत
महापालिकेचे स्मशानभूमीसाठी वार्षिक तरतूद : ७५ लाख
पिंपरी चिंचवड महापालिका
अंत्यसंस्कार सेवा : सशुल्क
एकूण स्मशानभूमी : १६
महिन्याला अंत्यसंस्कार : १२५ हून जास्त
नगरपालिकेचा वार्षिक खर्च : स्वतंत्र तरतूद नाही
कोविड रुग्णांसाठी आता महापालिका प्रत्येकी ८ हजार खर्च करते.
इतर लोकांचे अंत्यसंस्कार नातेवाइकांनी स्वत: लाकूड-शेणी आणून करण्याची सोय.
रत्नागिरी नगरपालिका :
अंत्यसंस्कार सेवा : सशुल्क
एकूण स्मशानभूमी : ०३
महिन्याला अंत्यसंस्कार : ३०
नगरपालिकेचा वार्षिक खर्च : १५ लाख
कोविड रुग्णांसाठी मोफत उपचार
इतर रुग्णांकडून दहन असेल तर प्रत्येकी १ हजार व विद्युतदाहिनी असेल तर ५०० रुपये शुल्क
फोटो : ०८०५२०२१-कोल-कोल्हापूर स्मशानभूमी
कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत गेली अनेक वर्षे मोफत अंत्यसंस्काराची सेवा दिली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरातही अशीच सेवा दिली जात असून त्याची लोकांना मदत होत आहे. (आदित्य वेल्हाळ)