रुग्ण, नातेवाइकाला रोज मोफत भोजन

By Admin | Updated: February 15, 2017 00:48 IST2017-02-15T00:48:20+5:302017-02-15T00:48:20+5:30

भूकमुक्तीच्या दिशेने : जयसिंगपूर युवा फौंडेशनचा अभिनव उपक्रम

Free daily meal for the patient, relatives | रुग्ण, नातेवाइकाला रोज मोफत भोजन

रुग्ण, नातेवाइकाला रोज मोफत भोजन

चंद्रकांत कित्तुरे -- कोल्हापूर --पैसे नाहीत म्हणून भजीपाव, वडापाव खाऊन राहणाऱ्या किंवा उपाशिपोटी झोपणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांवर आता असे करण्याची वेळ येणार नाही. कारण रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण आणि त्याचा एक नातेवाईक यांना मोफत भोजन देण्याचा उपक्रम जयसिंगपूर युवा फौंडेशनने एक फेब्रुवारीपासून सुरू केला आहे. हा उपक्रम सध्या जयसिंगपूर शहरातील रुग्णालयांपुरता मर्यादित आहे.
विधायक कार्याच्या उद्देशाने जयसिंगूपर शहरातील काही युवकांनी एकत्र येऊन २०१४ मध्ये या फौंडेशनची स्थापना केली आहे. समाजातील निराधार, असहाय आणि गरजूंना आधार देण्याचे कार्य फौंडेशन करीत आहे. जयसिंगूपर शहरात सरकारी, खासगी, सामाजिक संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या रुग्णालयांत दररोज शेकडो रुग्ण उपचार घेत असतात. ते जवळपासच्या खेड्यातून तसेच कर्नाटकातूनही उपचारासाठी जयसिंगपुरात येतात. त्यामध्ये हलाखीची परिस्थिती असलेले अनेक रुग्ण असतात. तसेच गाव लांब असल्याने आणि जवळ पैसा नसल्याने अनेक रुग्णांचे नातेवाईक केवळ भजीपाव, वडापाव, किंवा काहीतरी खाऊन अर्धपोटी दिवस काढीत असतात. ही बाब जयसिंगपूर युवा फौंडेशनचे अझर पटेल, निखिल कुंभार, अमर पाटील आणि अन्य सदस्यांच्या लक्षात आली. रुग्णालयात अशा अर्धपोटी, उपाशिपोटी, तसेच उघड्यावर झोपणाऱ्या नातेवाइकांसाठी मोफत भोजन आणि अंथरूण-पांघरूण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
गरजू रुग्ण आणि त्याचा एक नातेवाईक यांच्यासाठी हा उपक्रम राबविण्याचे ठरले. त्यानुसार फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शहरातील तीसहून अधिक रुग्णालयांशी संपर्क साधून या उपक्रमाची माहिती दिली आणि अशा गरजू रुग्ण आणि नातेवाइकांची माहिती कळविण्याचे आवाहन केले. हळूहळू त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.


४५ निराधारांना मोफत भोजन
समाजातील गरीब, वंचित, निराधार, अपंग, वृद्ध, अपत्यहीन, असहायांना भूकमुक्त करण्यासाठी चार एप्रिल २०१५ पासून जयसिंगपूर युवा फौंडेशनने मोफत भोजन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत सध्या दररोज ४५ अशा निराधारांना दोनवेळचे मोफत भोजन दिले जात आहे. शिवाय त्यांची दर महिन्याला आरोग्य तपासणी करून त्यांच्या औषधोपचाराचा खर्चही फौंडशनकडून केला जात आहे. समाजातील दानशुरांच्या मदतीने हा उपक्रम राबविला जातो.

कोणताही गाजावाजा न करता एक फेब्रुवारीपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या १४ दिवसांत केवळ पाच ते सहा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना याचा लाभ झाला आहे. रुग्णालय आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये याबाबत जागरुकता येईल, तसे याचे प्रमाण वाढेल आणि रुग्णालयांमध्ये कुणालाही अर्धपोटी, उपाशिपोटी किंवा उघड्यावर झोपावे लागणार नाही.
-अझर पटेल, सदस्य, जयसिंगपूर युवा फौंडेशन.

Web Title: Free daily meal for the patient, relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.