फसवणूक साडेतीन कोटींची, जप्ती ३४ लाखच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:08+5:302021-07-01T04:17:08+5:30
कोपार्डे : बालिंगा, ता. करवीर येथील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या सराफ सतीश पोवाळकरला अटक करण्यात आली. पोलिसांनी ...

फसवणूक साडेतीन कोटींची, जप्ती ३४ लाखच
कोपार्डे : बालिंगा, ता. करवीर येथील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या सराफ सतीश पोवाळकरला अटक करण्यात आली. पोलिसांनी जंगजंग पछाडून त्याची केवळ ३४ लाखांची मालमत्ता जप्त केली असून फसवणूक झालेल्या उर्वरित सव्वातीन कोटी रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे काय, हा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर उभा आहे.
बालिंगा येथील सराफाने गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा ागंडा घालत तो फरार झाला होता. पोलिसांना त्याला एक महिन्यानंतर पकडले. सराफाची झाडाझडती घेऊन त्याची कागदोपत्री केवळ ३४ लाख ५० हजार किमतीची मालमत्ता पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी ती जप्त केली. मात्र, हजारो गुंतवणूकदारांची सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम गिळंकृत करणाऱ्या सराफाने कोट्यवधीच्या रकमा कोठे ठेवल्या, त्याचे त्याने कोठे गुंतवणूक केली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली असली तरी आयुष्याची पुंजी आपल्याला परत मिळणार का, याकडे गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या आहेत.
चौकट
: विम्यात मोठी गुंतवणूक
सराफाने गुंतवणूकदारांच्या पैशाबरोबर सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारताना विम्यात मोठी गुंतवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. २२ विमा पॉलिसी घेऊन लाखो रुपयांचे आर्थिक संरक्षण आपल्या कुटुंबाला मिळवून दिले आहे. - प्रथमदर्शनी २३२ गुंतवणूकदारांनी सराफाकडे सुवर्णठेव योजनेमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. याशिवाय काही २९३ लोकांनी सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवून सराफाकडील कर्ज उचलले होते. दागिने गहाण ठेवणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. पण सुवर्ण ठेवमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची मोठी फसगत होण्याची भीती आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मालमत्तेतून केवळ नागदेववाडीतील प्लॉट व कनेरकरनगरमधील घर यातून काही प्रमाणात रक्कम वसूल होऊ शकते.