कोल्हापूर : स्वत:ची जागा, घर या मालमत्तेचे खरेदीपत्र करून देतो असे सांगून १५ लाख रुपये घेऊन ती मालमत्ता दुसऱ्यालाच विकून फसवणूक केल्याची तक्रार पूजा प्रकाश राजारामपूकर (वय ४७, रा. चव्हाण कॉलनी, कळंबा जेलसमोर, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी महेश रामचंद्र गायकवाड (रा, पंचरत्न विहार अपार्टमेंट, सर्वे कॉलनी, सानेगुरुजी वसाहत) यांच्यावर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महेश गायकवाड याने स्वत:ची जागा व घर या मिळकतींचे खरेदीपत्र करून देतो असे सांगून त्या मोबदल्यात पूजा राजापूरकर यांच्याकडून दि.२० मे २०१५ ते ऑगस्ट २०१९ पर्यंत वेळोवेळी रोख व चेकने एकूण १५ लाख रुपये स्वीकारले; पण संशयित गायकवाड याने खरेदीपत्र करून न देता तीच मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली. खरेदीपत्र करून न दिल्याने राजारामपूरकर यांनी गायकवाड याच्याकडे दिलेले १५ लाख रुपये परत करण्याचा तगादा लावला. पण, पैसे देण्यास टाळाटाळ करून धमकी दिली. याबाबत राजापूरकर यांनी गायकवाड याच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.