तळ ठोकलेले पोलीस बाडबिस्तारा उचलणार

By Admin | Updated: May 11, 2015 01:07 IST2015-05-11T01:03:36+5:302015-05-11T01:07:44+5:30

विनंती बदल्यांचा फॉर्म्युला : अर्ज सादर करण्याचा १५ मे अंतिम दिवस

The fractured police will take the bomber | तळ ठोकलेले पोलीस बाडबिस्तारा उचलणार

तळ ठोकलेले पोलीस बाडबिस्तारा उचलणार

एकनाथ पाटील / कोल्हापूर
अनेक वर्षांपासून एकाच तालुक्यात अथवा पोलीस ठाण्यात तळ ठोकलेल्या पोलिसांच्या बदल्या होणार आहेत. पोलीस प्रशासनाने विनंती बदल्यांचा ‘फॉर्म्युला’ वापरला असून, सेवा बजाविलेला तालुका सोडून इतर कोणत्याही तीन पोलीस ठाण्यांची मागणी पोलिसांना करता येणार आहे. बदल्यांचा धडाका दि. १६ ते ३१ मेअखेर पूर्ण होत असल्याने ठाण्यात ‘वजन मारणाऱ्या’ पोलिसांना लवकरच बाडबिस्तारा उचलावा लागणार आहे.
‘मार्च एंडिंग’ची धांदल संपताच पोलीस प्रशासनात बदल्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कोल्हापूर पोलीस दलात सुमारे २९०० पोलीस कर्मचारी आहेत, तर जिल्ह्यात २९ पोलीस ठाणी आहेत. यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, वाहतूक शाखा, जिल्हा विशेष शाखा, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा, नियंत्रण कक्ष, पोलीस मुख्यालय, आदी ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे सेवा बजाविणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करण्यात येत आहेत. तसेच २००७ मधील सार्वत्रिक बदलीच्या वेळी ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत, त्यांच्याही नियमांनुसार बदल्या करण्यात येणार असल्याने अनेक वर्षे एकाच तालुक्यात अथवा पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसलेल्या पोलिसांना आपला बिस्तारा उचलावा लागणार आहे.
विनंती बदल्यांसाठी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस शुक्रवार (दि. १५) पर्यंत आहे. ज्या पोलीस ठाण्यात यापूर्वी सेवा केली असेल, त्या पोलीस ठाण्याची मागणी करता येणार नाही. तसेच एकाच तालुक्यात यापूर्वी १२ वर्षे सेवा बजावलेली आहे, अशा तालुक्यामध्ये पुन्हा बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. मागणी केलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचे गाव नसावे, आदी नियम सक्तीचे करण्यात आले आहेत. १६ मेपासून बदल्यांच्या अर्जांची छाननी होऊन मुलाखती होतील. त्यानंतर ३१ मेअखेर बदल्यांचा टप्पा पूर्ण होईल.
सर्वांना माहिती देण्याची सूचना
पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्या ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे अर्ज स्वतंत्र न पाठविता ते एकत्रित करून कार्यालयास सादर करावेत. बदल्यांच्या परिपत्रकाची माहिती सलग तीन दिवस हजेरीवर वाचून दाखवावी तसेच नोटीस बोर्डावर प्रत लावण्यात यावी. जे कर्मचारी आजारी रजेवर किंवा प्रतिनियुक्तीवर असतील, त्यांनाही याची माहिती द्यावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी केल्या आहेत.
—————————————————-
‘कसुरी अहवाल’
ज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्तनाने खात्याच्या शिस्तीस बाधा येत असेल, अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी ‘कसुरी अहवाल’ सादर करण्याचे आदेश पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना डॉ. शर्मा यांनी दिले आहेत.
‘खात्यां’साठी चढाओढ
अतिमहत्त्वाचे खाते म्हणजे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) व शहर वाहतूक शाखा (ट्रॅफिक). तिथे काम करण्यासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत चढाओढ असते. या दोन्ही ठिकाणी सलग तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. ही दोन्ही खाती ‘मलईदार’ असल्याने बहुतांश पोलिसांनी या खात्यांना प्राधान्य दिले आहे.
 

Web Title: The fractured police will take the bomber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.