चार संशयित खलाशी ताब्यात
By Admin | Updated: August 22, 2014 00:55 IST2014-08-22T00:34:03+5:302014-08-22T00:55:22+5:30
१३ खलाशांची चौकशी : बेकायदा सिमकार्डचा वापर केल्याचा ठपका

चार संशयित खलाशी ताब्यात
रत्नागिरी : मच्छिमारी नौकांवर काम करणाऱ्या अनेक परदेशी खलाशांकडून बेकायदा मोबाईल सिमकार्ड वापराचे गंभीर प्रकरण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने उघडकीस आणले आहे. आज, गुरुवारी दुपारी मिरकरवाडा बंदरात छापा टाकून १३ जणांना ताब्यात घेण्यात आले. कागदपत्र तपासणीत चौघेजण संशयित सापडल्याने त्यांना पुढील चौकशीसाठी गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. चौकशी झालेल्या एकाचा गुन्हा शाबित झाल्याने त्याच्यासह मोबाईल व सिमकार्ड विक्रेत्याला ताब्यात घेऊन दोघांवर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यात मच्छिमारी नौकांवर खलाशी म्हणून काम करणारे अनेक खलाशी बेकायदेशीर मोबाईल सिमकार्ड वापरत असून त्यांच्याकडे ओळख पटविणारी आवश्यक कागदपत्रेही नसल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली. त्यावरून आज, गुरुवारी दुपारी पोलिसांनी मिरकरवाडा बंदर जेटीजवळ छापा टाकला. त्यात १३ जणांना ताब्यात घेतले. त्यांतील नऊजणांकडे योग्य कागदपत्रे मिळाल्याने त्यांना सोडूून देण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या चारपैकी दलबहादूर रामफल चौधरी (४०, नेपाळ, सध्या रा. मिरकरवाडा जेटी, रत्नागिरी) याच्या चौकशीत त्याच्याकडे बोगस ओळखपत्र सापडले. तसेच त्याच्याकडे बेकायदा मोबाईल सिमकार्डही आढळून आले. त्यासाठी त्याने विके्रत्याकडे कोणतीही कागदपत्रे सादर केली नव्हती. हे सिमकार्ड त्याने नाटे बाजारपेठेतील विक्रेता दर्शन सुहास कुवेसकर याच्याकडून घेतले आहे. मात्र दर्शन कुवेसकर याच्याकडे सिमकार्ड व मोबाईल विक्रीचा कोणताही परवाना नाही, अशी माहिती लगेचच पुढे आली. त्याने बेकायदा कोणतीही कागदपत्रे न घेता हा व्यवहार केल्याने त्यालाही नाटे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणातील आणखी तीन संशयितांची चौकशी सुरू असून त्यांच्याकडील सिम, ओळखपत्रप्रकरणी तपास सुरू आहे, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाकडून देण्यात आली.
गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाई करणाऱ्या पथकात उपनिरीक्षक कोळी, पोलीस नाईक सुनील पवार, संदीप काशीद, प्रवीण बर्गे, जमीर पटेल, राजू गमरे, आदी पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
देशाच्या सुरक्षेला धोका!
मच्छिमारी नौकांवर याप्रकारे बेकायदा सिमकार्ड वापर करणाऱ्यांकडून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याबाबतची तपासणी मोहीम सुरूच राहणार असून, दोषी आढळणाऱ्या खलाशांवर व संबंधित नौकांविरोधातही गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांनी दिली.