कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड येथील सराईत गुन्हेगार महेश राख याचा खून करून पळालेल्या हल्लेखोरांपैकी तिघांना सोमवारी (दि. १५) करवीर पोलिसांनी अटक केली. साने गुरुजी वसाहत येथील घरी पत्नीला भेटण्यासाठी आलेला सद्दाम सरदार कुंडले (वय २९) याला पोलिसांनी जेरबंद केले. शहरातील खानविलकर पेट्रोल पंपासमोरील बारमध्ये दारू पिण्यासाठी बसलेला आदित्य शशिकांत गवळी (रा. दत्त कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड) आणि हेरले (ता. हातकणंगले) येथील एका बारमधून धीरज राजेश शर्मा (रा. ज्योतिर्लिंग कॉलनी, पाचगाव) याला अटक केली.पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्यासह अंमलदार विजय तळसकर, रणजीत पाटील, सुजय दावणे, सुभाष सरवडेकर, योगेश लोकरे योगेश शिंदे, विजय पाटील, अमित जाधव, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण यांच्या पथकांनी हल्लेखोरांना अटक केली.पोलिसांनी रविवारी (दि. १४) अटक केलेल्या चौघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. मयूर दयानंद कांबळे (वय २२, रा. सानेगुरुजी वसाहत), सोहम संजय शेळके (२२, रा. गजानन महाराज नगर), पीयूष अमर पाटील (२३, रा. माजगावकर नगर, कोल्हापूर) आणि बालाजी गोविंद देऊलकर (२४, रा. पाचगाव) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.या गुन्ह्यातील टोळीप्रमुख सिद्धार्थ गवळी आणि ऋषभ मगर या दोघांचा अद्याप शोध सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे हल्लेखोरांनी फुलेवाडी परिसरात लपवून ठेवली आहेत. त्या शस्त्रांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली.मध्यवर्ती बसस्थानकावरून पळालेमहेश राख याचा खून केल्याप्रकरणी सर्व हल्लेखोर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले होते. पोलिस मागावर असल्याची माहिती मिळताच ते वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. यातील दोघे निपाणीला गेले. दोघे सांगलीला गेले, तर दोघे पुण्याला गेले. मोबाइल बंद करून पळाल्याने सुरुवातीला त्यांचा ठावठिकाणा पोलिसांना मिळाला नाही. आदित्य गवळी हा एसटीने पुण्याकडे निघाला होता. वाठारमध्येच उतरून तो एका मंदिरात झोपला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दारू पिण्यासाठी आले अन् सापडलेहल्लेखोर आदित्य गवळी हा नातेवाईकांना भेटण्यासाठी सीपीआर चौकात येणार होता. याची कुणकुण लागताच करवीर पोलिसांचे एक पथक सीपीआर चौकात पोहोचले. समोर पोलिस दिसताच आदित्यने पळ काढला. पोलिस हवालदार विजय तळसकर हे खानविलकर पेट्रोल पंपासमोरील बारमध्ये शोध घेण्यासाठी गेले असता समोरच आदित्य सापडला. धीरज शर्मा याला हेरले येथील एका बारमधून ताब्यात घेतले. जुनैद पटेल याला करवीर पोलिसांनी सोमवारी पहाटे राजारामपुरीतून अटक केली.सद्दाम कुंडले घरातच सापडलाहल्ल्यानंतर पळालेल्या सद्दाम कुंडलेचा शोध सुरू होता. साने गुरुजी वसाहत येथील त्याच्या घरावर साध्या वेशातील पोलिसांची पाळत होती. सोमवारी सकाळी बायकोला भेटण्यासाठी येताच पोलिसांनी त्याला जेरबंद केले.सीपीआरमध्ये समर्थकांची गर्दीअटकेतील हल्लेखोरांना वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणणार असल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी सोमवारी सायंकाळी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. लक्ष्मीपुरी पोलिसांनी समर्थकांना हटकले.