कोविड सेंटरमधील जेवणाचे चार महिन्यांचे बिल थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST2021-07-31T04:24:39+5:302021-07-31T04:24:39+5:30
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १६ एप्रिलपासून कोविड सेंटर सुरू झाले. या सेंटरमधील रुग्णांना चहा, नाष्टा, जेवण, फळे ...

कोविड सेंटरमधील जेवणाचे चार महिन्यांचे बिल थकीत
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १६ एप्रिलपासून कोविड सेंटर सुरू झाले. या सेंटरमधील रुग्णांना चहा, नाष्टा, जेवण, फळे देण्यासाठी, तसेच येथील साफसफाईसाठी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडून नियमितपणे रुग्णांसाठी ही सेवा दिली जाते. मे-जूनमध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होता त्यावेळी एका सेंटरमध्ये किमान ६० ते १७० पर्यंत रुग्ण होते. आता संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्यादेखील आटोक्यात आली आहे.
मात्र, रुग्णांना जेवण पुरविणारे केटरिंग व्यावसायिक, साफसफाईची यंत्रणा व मनुष्यबळ पुरविणारे कंत्राटदार यांची गेल्या चार महिन्यांतील लाखोंची बिलं थकीत आहेत. एका एका कंत्राटदाराची रक्कम १५ ते २५ लाखांपर्यंत आहे. कंत्राटदार धान्य दुकानदारांकडून उधारीवर मोठ्या प्रमाणात माल भरतात आणि शासनाकडून बिल मिळाले की कर्जे भागवितात. मात्र, नुकत्याच आलेल्या महापुरामुळे धान्य व्यावसायिकांकडील माल भिजला आहे. आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी पुरवठादाराकडे पैशांसाठी तगादा लावला आहे. आधीचे बिल द्या, अन्यथा धान्य देणार नाही असा पवित्रा घेतल्याने पुरवठादारांची मोठी आर्थिक अडचण झाली आहे.
----
मी शिंगणापूर कोविड सेंटरला जेवण आणि साफसफाईची यंत्रणा पुरविताे. माझे २५ लाखांचे बिल थकीत आहे. धान्य व्यावसायिक उधारीवर धान्य द्यायला तयार नाही. आमची अडचण ओळखून प्रशासनाने सगळी नाही तरी किमान रक्कम येईल तशी एक-दोन महिन्यांची बिलं तरी द्यावीत.
पुरवठादार
---