राज्यातील चार, कर्नाटकातील तीन गावे बाधित!
By Admin | Updated: November 28, 2014 00:14 IST2014-11-27T21:01:03+5:302014-11-28T00:14:19+5:30
दूषित पाण्याचा पुरवठा : सुमारे दहा हजार लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न

राज्यातील चार, कर्नाटकातील तीन गावे बाधित!
राम मगदूम - गडहिंग्लज -हिरण्यकेशी नदीच्या पाण्यात मळीमिश्रीत सांडपाणी मिसळल्यामुळे नांगनूरसह अरळगुंडी, कडलगे व इदरगुच्ची ही महाराष्ट्रातील चार, तर गोटुर, हेब्बाळ व चिकालगुड्ड ही कर्नाटकातील तीन खेडी बाधित होत असल्यामुळे सीमाभागातील सुमारे दहा हजार लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.
सात वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्यामुळे नांगनूर ग्रामस्थांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर देवणे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयात जाऊन समक्ष तक्रार दिली.
त्यानुसार उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर, क्षेत्र अधिकारी वर्षा कदम, राजेश औटी व जयदीप कुंभार यांनी जिल्हाप्रमुख देवणे यांच्यासह गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, उपसरपंच अशोक जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब मोकाशी आणि शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांसह मळीमिश्रीत सांडपाणी येणाऱ्या ओढ्याची व हिरण्यकेशी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. प्रदूषित पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले.
या प्रदूषित पाण्यामुळे मोठ्याप्रमाणात नदीतील मासे मृत होण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच ग्रामस्थांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.
‘नांगनूर’च्या पाण्याचा प्रश्न
संकेश्वर येथील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याकडून येणाऱ्या आणि नांगनूरनजीक हिरण्यकेशी नदीत मिसळणाऱ्या पाटीलकोडी नावाच्या ओढ्यातील मळीमिश्रीत सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी. शेजारी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, उपसरपंच अशोक जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.