आजपासून चार दिवस पावसाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:23 IST2021-05-07T04:23:55+5:302021-05-07T04:23:55+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात आजपासून चार दिवस पावसाचे राहतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नव्याने पेरणीसाठी शिवार तयार ...

आजपासून चार दिवस पावसाचे
कोल्हापूर : जिल्ह्यात आजपासून चार दिवस पावसाचे राहतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नव्याने पेरणीसाठी शिवार तयार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे, तर भात, नाचणी, सोयाबीन, भूईमूग, सूर्यफुलासह उन्हाळी पिकांच्या काढणी खोळंबणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे.
केरळ ते विदर्भ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने संपूर्ण राज्यभर सोमवारपर्यंत वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दुपारपर्यंत कमालीचा उष्मा आणि त्यानंतर पावसाची हजेरी राहील, असेही संभाव्य अंदाजात म्हटले आहे. ढगाळ वातावरणही कायम राहणार आहे. दरम्यान, गुरुवारीही दिवसभर कमालीचा उष्मा जाणवत होता. दुपारी बारापर्यंत कोंदट वातावरण होते. दुपारी एकपर्यंत सूर्यदर्शन झालेच नव्हते. पावसाची शक्यता, पण वातावरण निवळले. संध्याकाळी पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले.
गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार हजेरी लावलेल्या वादळी पावसामुळे मात्र खरीपपूर्व मशागतींना जोर आला आहे. पुढील चार दिवस पावसाचे असल्याचा अंदाज आल्याने तर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने वेगाने नांगरटी आणि सऱ्या सोडण्याचे काम हाती घेतले आहे. भात पिकासाठी धुळवाफ पेरणी करता जमिनी सपाटीकरण सुरू झाले आहे, तर तरवे टाकण्यासाठी वाफे तयार करण्याचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. उन्हाचा तडाखा असतानाही शेतकरी शिवारात घाम गाळतानाचे चित्र जागोजागी दृष्टीस पडत आहे.
ओलिताची बारमाही सोय उपलब्ध असलेल्या ठिकाणी उन्हाळी पिके घेण्याकडे कल वाढला आहे. यात भात, नाचणी, सोयाबीन, भूईमूग, सूर्यफूल, ज्वारी, मूग, उडीद, तीळ ही पिके जिल्ह्यात प्रामुख्याने घेतली जातात. आता या पिकांची काढणी सुरू आहे. एका बाजूला पेरणीसाठी नव्याने शिवार तयार करण्याचे तर आहे ते शिवार रिकामे करण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करीत आहे. पाऊस पाठ सोडत नसल्याने मोड येऊ नयेत म्हणून शेतातून कापणी करून आणून ते घराच्या परिसरात सुरक्षित आणून त्याची मळणी सुरू केल्याचेही चित्र सर्वत्र दृष्टीस पडत आहे.