केएमटीला १०० बसेस देण्यास चार कंपन्या इच्छुक
By Admin | Updated: June 14, 2014 01:26 IST2014-06-14T01:21:39+5:302014-06-14T01:26:17+5:30
महिन्याभरात वर्क आॅर्डर : चार कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ‘केएमटी’कडून निविदा फॉर्म घेतले

केएमटीला १०० बसेस देण्यास चार कंपन्या इच्छुक
भारत चव्हाण, कोल्हापूर : महानगरपालिका परिवहन विभागाकडे (केएमटी) घेण्यात येणाऱ्या नव्या कोऱ्या १०४ बसेसचा पुरवठा करण्यास चार नामवंत उत्पादक कंपन्या इच्छुक आहेत. या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ‘केएमटी’कडून निविदा फॉर्म घेतले आहेत. येत्या सोमवारपर्यंत (१६ जून) निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख असून, पुढच्या चार-पाच दिवसांत टेक्निकल व फायनान्सियल बिड उघडून या महिनाअखेरीस वर्क आॅर्डर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नव्या बसेसच्या करासाठी प्रशासनाने पाच कोटींची तरतूदही केली आहे.
केंद्रातील कॉँग्रेस आघाडी सरकारने कोल्हापूर महापालिका (केएमटी) परिवहन विभागास १०४ नव्या बसेस घेण्यासाठी ४४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या कामात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. निधी मंजूर झाला, निविदा मागविल्या; परंतु केएमटीच्या ताफ्यात बसेस येण्यापूर्वी कॉँग्रेसची सत्ता गेली. त्यामुळे एकदा झालेल्या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याने बसेस खरेदीची सर्व कायदेशीर प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.
आचारसंहितेपूर्वीच केएमटी प्रशासनाने बसेस खरेदीकरिता निविदा मागविल्या आहेत. निविदा भरण्याची शेवटची तारीख १६ जून आहे. आतापर्यंत चार कंपन्यांनी निविदा नेल्या आहेत. या कंपन्या बसेस पुरवठा करण्यास इच्छुक आहेत. १७ जून रोजी पहिल्यांदा टेक्निकल बिड उघडण्यात येणार आहेत. त्यानंतर फायनान्सियल बिड उघडली जाणार आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंजूर निविदाधारक कंपनीला वर्क आॅर्डर दिली जाणार आहे. केंद्र सरकारची एक समिती असून, तिने ठरविलेल्या साच्यानुसार एक प्रोटोटाईप बस तयार करून दाखवायची आहे. त्याला समितीची मान्यता मिळताच पुढील प्रत्येक महिन्याला २५ याप्रमाणे पहिल्या टप्प्यात ७५ बसेसचा पुरवठा संबंधित कंपनीने करायचा आहे. दुसऱ्या टप्प्यात २९ बसेस पुरवायच्या आहेत. ज्यांनी निविदा भरल्या आहेत, त्या कंपन्यांची दिवसाला १० ते १५ बसेस बनविण्याची क्षमता आहे. त्यामुळे एकदा प्रोटोटाईप बसला मंजुरी मिळाली की, दोन महिन्यांतच सर्व बसेस ताफ्यात दाखल होतील, अशी अपेक्षा आहे.