व्यवस्थापकासह चौघांना अटक

By Admin | Updated: August 18, 2014 00:05 IST2014-08-18T00:05:14+5:302014-08-18T00:05:53+5:30

सिलिंडरचा काळाबाजार : कोल्हापुरातील दोघांचा समावेश

The four arrested with the manager | व्यवस्थापकासह चौघांना अटक

व्यवस्थापकासह चौघांना अटक

सांगली : गॅस सिलिंडरच्या काळाबाजारप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य संशयित शाहरुख खतीब यास सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या सांगलीतील संजयनगरमधील खेराडकर गॅस एजन्सीचा व्यवस्थापक शशिकांत पाटील यांच्यासह चौघांना आज, रविवारी सकाळी अटक करण्यात आली. यामध्ये कोल्हापुरातील दोन व्यापारी व फरारी असलेल्या खोली मालकाचा समावेश आहे. खेराडकर गॅस एजन्सीच्या रेकॉर्डची तपासणी केली जात आहे. त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. दरम्यान, खतीबला सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या कोल्हापुरातील आणखी एकाचे नाव निष्पन्न झाले आहे. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक रवाना करण्यात आले आहे. अटक केलेल्यांमध्ये व्यवस्थापक शशिकांत कलगोंडा पाटील (वय ४३, रा. लिंगायत गल्ली, कुपवाड), व्यापारी मोहित सुरेशचंद्र गुप्ता (३२, ताराबाई पार्क, कोल्हापूर), नरेंद्रभाई गोकुळभाई पटेल (४८, रूईकर कॉलनी, कोल्हापूर), खोलीचा मालक शब्बीर दस्तगीर अथणीकर (५२, शिवशंभो चौक, कर्नाळ रस्ता, सांगली) यांचा समावेश आहे.  खतीब याने अथणीकर यांची शिवशंभो चौकातील खोली भाड्यानेघेऊन तिथे घरगुती व व्यावसायिक सिलिंडरचा बेकायदा साठा केला होता. तो इलेक्ट्रीक मोटारीने गॅस भरुन देण्याचा व्यवसाय करीत होता. चार दिवसांपूर्वी गुन्हे अन्वेषणने छापा टाकून ५० सिलिंडर, चार इलेक्ट्रीक मोटारी जप्त केल्या होत्या. त्याने इलेक्ट्रीक मोटारी गुप्ता व पटेल या व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या दोन्ही व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही व्यापाऱ्यांचा वाहनांचे गॅसकिट विक्रीचा व्यवसाय आहे. ते मूळचे गुजरातचे आहेत. व्यवसायाच्यानिमित्ताने ते पंधरा वर्षापूर्वी कोल्हापुरात स्थायिक झाले आहेत.जप्त करण्यात आलेल्या ५० सिलिंडरपैकी २० सिलिंडर खेराडकर गॅस एजन्सीचा व्यवस्थापक शशिकांत पाटील याने दिल्याचे खतीब याने सांगितले आहे. यामुळे पाटीलला अटक केली आहे. एजन्सीमधील महत्त्वाचे रेकॉर्ड ताब्यात घेऊन तपासणी केली जात असल्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, खेराडकर एजन्सीकडे सभासदांना घरपोच सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगार आहेत. या कामगारांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.
चौकशीत ज्यांची नावे पुढे येतील, त्या सर्वांना अटक केली जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही. सिलिंडरचा काळाबाजार केल्याप्रकरणी यापूर्वी रेकॉर्डवर आलेल्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचीही चौकशी सुरु आहे. (प्रतिनिधी)

कोल्हापुरात छापे
खतीबला कोल्हापुरातील एका व्यक्तीने २० ते २५ सिलिंडरचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यक्तीचा शोध सुरू आहे. त्याच्या शोधासाठी एक पथक रवाना करण्यात आले असल्याचे उपनिरीक्षक चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले की, तो सापडल्यानंतर त्याचे नाव जाहीर केले जाईल. येत्या एक-दोन दिवसांत त्याला अटक करण्यात यश येईल. यामध्ये मोठी साखळी आहे. या प्रकरणाचा तपास कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे. गरज पडल्यास तेथील पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.

Web Title: The four arrested with the manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.