पेंटरांच्या चित्रपटांतून प्रबोधनाचा पाया
By Admin | Updated: June 4, 2015 00:44 IST2015-06-04T00:36:32+5:302015-06-04T00:44:17+5:30
अविनाश सुभेदार : कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती उत्साहात

पेंटरांच्या चित्रपटांतून प्रबोधनाचा पाया
कोल्हापूर : चित्रपट हे समाजप्रबोधनाचे सशक्त माध्यम आहे. भारतीय सिनेसृष्टीत नवे मानदंड निर्माण करणारे कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी या प्रबोधनात्मक आणि सामाजिक चित्रपटांतून प्रबोधनाचा पाया रचला, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी काढले.
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे बुधवारी पद्माराजे उद्यानात कलामहर्षीच्या पुतळ््याचे व खरी कॉर्नर येथील मानस्तंभाचे पूजन करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर होते.
सुभेदार म्हणाले, हिंदी चित्रपटसृष्टीत मागणी तसा पुरवठा करणारे चित्रपट निर्माण केले जातात पण मराठी चित्रपटांनी प्रबोधनाची परंपरा जपली आणि आजही ती नेटाने प्रवाहित ठेवली आहे. मी स्वत: एक अधिकारी असलो तरी कलावंत आहे. लहानपणी, महाविद्यालयात असताना मी अनेक नाटकांमध्ये काम केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला कलावंतांचा सहवास मिळाला.
विजय पाटकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, विजयमाला मेस्त्री, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे चंद्रकांत जोशी, दिलीप बापट, अभिनेत्री शांता तांबे, आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे उपस्थित होते.
कमानीला नाव
आयटीआय रोडवरील नाळे कॉलनी परिसरात भालजी पेंढारकरांच्या पत्नी लीलाबाई पेंढारकर राहत असत. याच परिसरात भालजींनी वास्तव्य केले. त्यामुळे येथील रस्त्याला ‘भालजी पेंढारकर पथ’, उद्यानाचे ‘लीलाबाई पेंढारकर उद्यान’ असे नामकरण करण्यात येणार आहे तसेच येथे उभारण्यात येणाऱ्या कमानीलाही भालजींचे नाव देण्यात येणार आहे. महापालिकेत याबाबतचा ठराव झाला असून लवकरच त्यावर कार्यवाही सुरू केली जाईल, असे नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी यावेळी सांगितले. कमानीसाठी चित्रपट महामंडळदेखील सहकार्य करेल, अशी ग्वाही अध्यक्ष विजय पाटकर यांनी दिली.