पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाची पायाभरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:14+5:302021-07-07T04:31:14+5:30
कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक कोल्हापुरातील नवीन वाशी नाका येथे उभारण्यात येणार आहे. सुमारे २ कोटी ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाची पायाभरणी
कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक कोल्हापुरातील नवीन वाशी नाका येथे उभारण्यात येणार आहे. सुमारे २ कोटी रुपये खर्चाच्या स्मारकाच्या कामाचा प्रारंभ मंगळवारी करण्यात आला. पहिल्या टप्प्यात आकर्षक संरक्षक कठडा, चबुतरा, अहिल्यादेवींच्या जीवनावरील शिल्पे अशी विविध ५० लाखांची कामे करण्यात येणार आहे. माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्या हस्ते स्मारकाची पायभरणी करण्यात आली. बबन रानगे अध्यक्षस्थानी होते.
अहिल्यादेवींचे जन्मस्थळ असलेले अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी, सांगली पाठोपाठ कोल्हापुरातही भव्य स्मारक होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यात अहिल्यादेवींचे स्मारक व्हावे, अशी धनगर समाजाची मागणी होती. मल्हारसेनेचे बबन रानगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून स्मारकाचा प्रश्न सोडवून घेतला. स्मारकासाठी वाशी नाका येथे सुमारे ६ हजार चौरस फूट जागा मंजूर करून घेतली आहे. महापालिकेच्या आर्थिक अंदाजपत्रकात पहिल्या टप्प्यातील कामासाठी ५० लाखांची तरतूद केली. यासाठी आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांचे सहकार्य लाभले आहे. आर्किटेक्ट रणजित निकम यांनी या स्मारकाचा आराखडा तयार केला आहे.
पायाभरणी कार्यक्रमास माजी नगरसेवक राजसिंह शेळके, राहुल माने, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडी, सागर यवलुजे, शिवराज नायकवडी, मोहन सालपे, तानाजी लांडगे, पत्रकार बाबूराव रानगे, राघू हजारे, बाबूराव बोडके, सुरेश धनगर, भगवान हराळे, किरण पाटील, कृष्णात रेवडे, प्रा. टी. के. सलगर, प्रल्हाद देबाजे आदी उपस्थित होते. गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. बाळासाहेब कोळेकर यांनी आभार मानले.
चौकट
असे असणार स्मारक
- अहिल्यादेवींच्या जीवनावरील आर्ट गॅलरी
- विविध भाषेतील वाचनालय
* आकर्षक नक्षीदार संरक्षक कठडा
* अभ्यासिका
* अहिल्यादेवींचा भव्य पुतळा
* भव्य चबुतरा
* अहिल्यादेवींच्या जीवनावरील शिल्पे
* सुशोभीकरण
फोटो : ०६०७२०२१-कोल- भूमिपूजन
कोल्हापुरातील नवीन वाशी नाका येथे मंगळवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे भूमिपूजन माजी महापौर निलोफर आजरेकर, शारंगधर देशमुख, बबन रानगे, सुलोचना नायकवडी, राजसिंह शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.