कोल्हापूर : उद्धवसेनेचे माजी आमदार, जिल्हा बँकेचे संचालक संजय घाटगे व ‘गोकुळ’ दूध संघाचे संचालक अंबरिष घाटगे हे उद्या मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीपासून ते भाजपच्या संपर्कात आहेत, अखेर पक्षप्रवेशाचा त्यांना मुहूर्त मिळाला आहे.
भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजपच्या नेतृत्वाने यापूर्वीच २०२९ मध्ये पक्ष स्वबळावर सत्तेवर येईल, असे जाहीर केले आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रत्येक मतदारसंघांत बांधणी सुरू केली आहे. कोल्हापुरातील दहाही मतदारसंघात त्यांनी चाचपणी सुरू केली असून ‘कागल’मध्ये संजय घाटगे यांना पक्षात घेऊन पुढची जोडणी लावली आहे.
दरम्यान, उद्या दुपारी अडीच वाजता भाजपच्या मुंबई कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित ते पक्षात प्रवेश करणार आहेत. यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, कोल्हापूर महानगर अध्यक्ष विजय जाधव हे मुंबईला रवाना झाले आहेत.
शिवसेना व्हाया ‘स्वाभिमानी’ ते भाजप..
संजय घाटगे यांच्या राजकीय उड्या खूप मोठ्या आहेत. एकसंध शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, उद्धव सेना असे प्रमुख सर्व पक्ष झाल्यानंतर आता भाजपमध्ये ते जात आहेत..
कागलमध्ये मेळावा..
पक्षप्रवेशाची मंगळवारी औपचारिकता झाल्यानंतर महिन्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कागलमध्ये मेळावा घेतला जाणार आहे.