माजी महापौरांनी भिरकावली फाईल
By Admin | Updated: August 22, 2014 00:51 IST2014-08-21T23:52:46+5:302014-08-22T00:51:11+5:30
मोबाईल टॉवरवरून आक्रमक : एचसीएल, कचरा प्रश्नावरून प्रशासन धारेवर

माजी महापौरांनी भिरकावली फाईल
कोल्हापूर : शहरात खुल्या जागेत मोबाईल टॉवर उभारल्याने पर्यावरणास मोठा धोका निर्माण होईल, या कारणास्तव आज, गुरुवारी झालेल्या महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाचा टॉवर उभारण्याचा डाव हाणून पाडला. अशा प्रकारचे ठराव आणण्यापूर्वी सभागृहास पूर्वकल्पना द्या, प्रशासनाच्या अशा कुरघोड्यांमुळेच नगरसेवक बदनाम होत आहेत, असा आरोप करीत माजी महापौर सुनीता राऊत यांनी फाईल अधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावून निषेध व्यक्त केला.
कचरा प्रश्न, कारागृहाभोवती ५०० मीटरचा नवा निकष, एचसीएल, ई-गव्हर्नन्स कंपनीवरून नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. कचऱ्यांपासून वीजनिर्मिती करण्याचा ठेका दिलेली रोकेम ही कंपनीही पुण्यात सक्षमपणे काम करीत नाही. अशा वेळी प्रशासनाने कचऱ्याप्रश्नी त्वरित ठोस निर्णय घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली.
येत्या काही महिन्यांत टाकाळा येथे लँड फिल्ड साईट सुरू होणार असल्याने कचऱ्यांतून शहराची मुक्ती होईल, अशी ग्वाही आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सभागृहास दिली. शहरातील कचऱ्यांसाठी आरक्षित केलेल्या जागामालकांनी टी.डी.आर.चा लाभ घेतला आहे. त्या जागी कचरा प्रकल्प उभा करण्याची मागणी भूपाल शेटे यांनी केली.
एचसीएल या ई-गव्हर्नन्स कंपनीशी महापालिकेने केलेला करार, केलेले काम, देत असलेली सेवा व त्यासाठी अदा केलेले पैसे याबाबत केंद्रीय लेखापरीक्षकांनी जोरदार आक्षेप घेतले आहेत, असा आरोप करीत महेश कदम यांनी कंपनीला जादा दिलेल्या दोन कोटी रुपयांची वसुली कशी करणार, असा सवाल उपस्थित केला.
बिंदू चौकातील उपकारागृह व कळंबा कारागृहाभोवती ५०० मीटर जागा विकसित न करण्याबाबत शासन आदेश आहेत. याबाबत नेमलेल्या उच्चस्तरीय स्थायी समिती सदस्यांची त्वरित बैठक घेऊन अभिप्राय द्यावा, अशी मागणी नगरसेवक आदिल फरास यांनी केली.