अपघातग्रस्त महिलेला माजी फुटबॉलपटंूची मदत
By Admin | Updated: November 21, 2015 00:40 IST2015-11-21T00:38:42+5:302015-11-21T00:40:15+5:30
कौतुकास्पद काम : महागड्या उपचार खर्चासाठी सुरू आहे संघर्ष

अपघातग्रस्त महिलेला माजी फुटबॉलपटंूची मदत
कोल्हापूर : वाशी (ता. करवीर) येथे एका वळणावर तवेरा गाडीची रिक्षाला धडक बसली. त्यातून प्रवास करणाऱ्या भाजी विक्रेत्या कमल शिवाजी मोरे (वय ४५, रा. मंगळवार पेठ) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. घरची परिस्थिती गरीब असल्याचे समजल्यानंतर शिवाजी तरुण मंडळाच्या माजी फुटबॉलपटूंनी त्यांच्या उपचाराकरिता दहा हजार रुपये हॉस्पिटल प्रशासनाकडे शुक्रवारी दिले.
अपघातग्रस्त कमल या वाशी येथे आपल्या भाजी विक्रेत्या मैत्रिणींसह देवदर्शनासाठी गेल्या होत्या. घरी परतत असताना वाटेत एका मोठ्या वळणावर अचानक समोरून आलेल्या तवेरा गाडीने या रिक्षाला धडक दिली. यावेळी रिक्षाचालक व अन्य महिला बाहेर फेकल्या गेल्या. या धडकेने रिक्षातील कमल व अन्य महिला रिक्षासह फरफटत गेल्या. त्यात कमल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रथम त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी राजारामपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचाराचा खर्च मोठा असल्याने मोरे कुटुंबीयांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज होती.
ही गरज कानी पडताच शिवाजी तरुण मंडळाचे माजी फुटबॉलपटू प्रा. अमर सासने, मनोज जाधव, रणजित इंगवले, संदीप पाटील, रमेश पाटील, सुनील जाधव, विकास पाटील, सुनील जाधव, धनाजी सूर्यवंशी यांच्यासह मनोज जाधव (ज्युनिअर), सुहास साळोखे, योगेश वणिरे, नीलेश जाधव, संतोष तावडे यांनी तत्काळ १० हजार रुपयांची मदत हॉस्पिटल प्रशासनाकडे शुक्रवारी जमा केली आहे. ( प्रतिनिधी )
दानशूरांच्या मदतीची गरज
कमल या राष्ट्रीय शालेय फुटबॉलपटू ओंकार मोरे यांच्या मातोश्री आहेत. त्या कपिलतीर्थ मार्केटमध्ये लिंबू विक्रीचा व्यवसाय करतात. ओंकारसह त्यांना काजल ही मुलगी आहे. त्यांच्या चरितार्थ केवळ लिंबू विक्रीच्या व्यवसायातून चालतो. त्यामुळे कमल यांना समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची आवश्यकता आहे.