माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: July 18, 2015 00:18 IST2015-07-17T23:57:31+5:302015-07-18T00:18:55+5:30
इचलकरंजीतील घटना : दोन गटांत मारामारी

माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला
इचलकरंजी : वादग्रस्त जागेतील मुरूम भरण्याच्या कारणावरून येथील जवाहरनगरात दोन गटांत तुंबळ मारामारी झाली. यामध्ये माजी नगरसेवक जहॉँगीर गणी पटेकरी (वय ४४) यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आला, तर विरोधी गटातील महादेव शंकर सूर्यवंशी (५१) यांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. दरम्यान, सूर्यवंशी यांच्या घरावर दगडफेक व बुरूड व्यवसायासाठी आणलेले बांबू पेटवून दिले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. शिवाजीनगर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.पटेकरी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सूर्यवंशी यांनी पालिकेच्या जागेत अतिक्रमण करून बांबू ठेवले होते. हे अतिक्रमण पटेकरी नगरसेवक असताना त्यांनी काढले होते. तेव्हापासून त्यांच्यात वाद-विवाद होते. गुरुवारी सायंकाळी मोकळ्या जागेत ठेवलेला मुरूम भरून नेताना सूर्यवंशी यांनी अडवणूक केली. याचा जाब विचारण्यासाठी पटेकरी गेले असता तुला आता सोडत नाही, असे म्हणून कोयत्याने डोक्यात वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सूर्यवंशी यांच्या दोन्ही मुलांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पटेकरी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सूर्यवंशी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, घराशेजारच्या जागेत शेजाऱ्यांच्या संमतीने वासे व बांबू ठेवले होते. येथील मुरूम गुरुवारी सायंकाळी भरून नेताना अडवणूक केल्याचा जाब विचारण्यासाठी पटेकरी यांच्यासह कार्यकर्ते सद्दाम पटेकरी, सचिन बिरांजे, सुतार, सचिन सावंत, अनिल चौगुले, प्रशांत निकम, राहुल पिरगोने, त्यांची मुले व इतर सात ते आठजण सूर्यवंशी यांच्या घरी गेले. यावेळी ‘काल झालेल्या वादात तुम्ही मला शिवीगाळ का केली, मी तुम्हाला येथे ठेवत नाही. तुमचा धंदाच बंद करतो’, असे म्हणून शिवीगाळ करीत मारहाण केली. तेथून सूर्यवंशी व त्यांचा मुलगा अविनाश, अवधूत हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते. यावेळी शाहू पुतळ्याजवळ सात ते आठजणांनी त्यांना अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दगडाने डोक्यात मारले.
यामध्ये सूर्यवंशी यांना डोक्याला व डाव्या हाताला मार लागला आहे. सूर्यवंशी यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले होते. (वार्ताहर)