पाणीपुरवठ्याच्या वीज बिलावरील व्याजाची रक्कम माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:43+5:302021-06-19T04:17:43+5:30
आजरा : मागील दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीच्या संसगार्मुळे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींची वसुली मोठ्या प्रमाणात थकीत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पाणीपुरवठा ...

पाणीपुरवठ्याच्या वीज बिलावरील व्याजाची रक्कम माफ करा
आजरा : मागील दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीच्या संसगार्मुळे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींची वसुली मोठ्या प्रमाणात थकीत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाच्या मोटरची विद्युत बिले थकीत आहेत. वीज वितरणने विद्युत बिलाची थकबाकी व्याजासह भरा अन्यथा वीज खंडित करण्यात येईल, अशा नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने विद्युत बिलांवरील व्याजाची रक्कम माफ करावी, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे. मागणीचे निवेदन आमदार प्रकाश आबीटकर व वीज वितरणचे सहायक अभियंता दयानंद कमतगी यांना दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांचे अर्थचक्र थांबले आहे. त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या करवसुलीवर झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने पाणीपुरवठा बिलांवरील व्याज माफ केल्यास अनेक ग्रामपंचायतींना त्याचा दिलासा मिळणार आहे.
राज्य शासनाने सदर थकीत रकमेवरील व्याज माफ करावे किंवा व्याजाची रक्कम १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्यास परवानगी द्यावी. अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
वीज वितरणचे सहायक अभियंता दयानंद कमतगी यांना सरपंच परिषदेचे आजरा तालुका अध्यक्ष संजय पाटील व कोरीवडेचे दत्ता पाटील यांनी निवेदन दिले आहे.
-----------------------
* फोटो ओळी : पाणी पुरवठ्याच्या वीज बिलावरील व्याजाची रक्कम माफ करावी, या मागणीचे निवेदन सहाय्यक अभियंता दयानंद कमतगी यांच्याकडे देताना संजय पाटील व दत्ता पाटील.
क्रमांक : १८०६२०२१-गड-०६