‘कृष्णा’च्या रणांगणात पक्षनिष्ठेचा विसर

By Admin | Updated: May 30, 2015 00:08 IST2015-05-29T22:38:34+5:302015-05-30T00:08:01+5:30

वातावरण तापले : काँग्रेसचे जितेंद्र पाटील भाजपच्या सहकार पॅनेलमध्ये

Forget about the fate of 'Krishna' battlefield | ‘कृष्णा’च्या रणांगणात पक्षनिष्ठेचा विसर

‘कृष्णा’च्या रणांगणात पक्षनिष्ठेचा विसर

अशोक पाटील - इस्लामपूर -कृष्णा साखर कारखान्याच्या रणांगणात वाळवा तालुक्यातील स्थानिक नेत्यांना पक्षनिष्ठेचा विसर पडला आहे. जिल्हा बँकेत राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना एकत्र आले. मग आम्ही का येऊ नये, या भूमिकेतून बोरगाव येथील काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांनी भाजपचे सहकार पॅनेलप्रमुख डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलची उमेदवारी मागितली आहे. त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट असून, काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांचा आदेश त्यांनी धुडकावून लावला आहे.
वाळवा तालुक्यातील बोरगाव गावात ‘कृष्णा’चे ७५0 सभासद आहेत. बोरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातही ‘कृष्णा’च्या सभासदांची संख्या मोठी आहे. डॉ. इंद्रजित मोहिते गटाच्या बाळनाना पाटील यांना ‘कृष्णा’च्या संचालक पदाची संधी अनेक वर्षे मिळाली, परंतु गेल्या निवडणुकीत उदय शिंदे यांनी अविनाश मोहिते गटाकडून संचालकपद मिळवले होते. यंदा डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलकडून बाळनाना पाटील यांचे चिरंजीव स्नेहल पाटील यांनी उमेदवारी मागितली आहे. ‘रयत’मधून त्यांनाच उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे.
या मातब्बरांना आव्हान देण्यासाठी डॉ. सुरेश भोसले यांनी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. बोरगाव गटात जितेंद्र पाटील यांचे वर्चस्व आहे. सध्या त्यांच्या पत्नी सौ. जयश्री पाटील काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम रयत पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे डॉ. कदम यांनी जितेंद्र पाटील यांना डॉ. मोहिते यांच्या पाठीशी राहण्याचा सल्ला दिल्याचे समजते. परंतु हा आदेश धुडकावून पाटील यांनी थेट भाजपचे सुरेश भोसले यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे या गटातील निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.


मी काँग्रेसचा असलो तरी, सहकार क्षेत्रातील ही निवडणूक पक्षीय नाही. त्यामुळेच डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलला साथ केली आहे. माझी उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे.
- जितेंद्र पाटील,
माजी जि. प. सदस्य, बोरगाव

Web Title: Forget about the fate of 'Krishna' battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.