गडहिंग्लज : रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या लिलावातील झाडांच्या वाहतुकीसाठी ५ हजारांची लाच मागितल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे येथील परिमंडल वनअधिकारी कार्यालयाचे वनपाल सागर पांडुरंग यादव (४३, मूळगाव हसूर दुमाला, ता. करवीर, सध्या रा. गणेश बंगला, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसातून मिळालेली माहिती अशी, शेंद्री येथील तक्रारदार लाकूड व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता रुंदीकरणात बाधित होणारी झाडे निविदा प्रक्रियेतून घेऊन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात.दरम्यान, हेळेवाडी ते बुगडीकट्टी दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्या रस्त्यात बाधित होणारी झाडे तोडण्याचा ठेका त्यांना लिलावाद्वारे मिळाला आहे. त्यानुसार त्यांनी आजरा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे झाडे तोडणे आणि वाहतुकीचा परवाना मागितला होता. त्यांचा अर्ज येथील परिमंडल वनअधिकारी कार्यालयात चौकशीसाठी आल्याचे त्यांना समजले.दरम्यान, आपल्या अर्जाचे पुढे काय झाले? याच्या चौकशीसाठी ते येथील कार्यालयात आले होते. त्यावेळी वनपाल यादव यांनी अर्जाच्या चौकशीचा अहवाल मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी ६ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तडजोडीअंती ५ हजार देण्याचे ठरले होते. त्यासंदर्भात त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.२९ एप्रिल २०२५ रोजी लाचलुचपत विभागाच्या पथकाने पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली. त्यात यादव याने स्वत:साठी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. परंतु, त्याने लाच स्वीकारलेली नाही. तक्रारदाराच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला अधिक तपास करीत आहेत.
Kolhapur: लिलावातील झाडांच्या वाहतुकीसाठी ५ हजार मागितले, वनपाल अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 15:07 IST