राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य शासनाच्या गाय दूध अनुदानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी व मल्टिस्टेट दूध संघाकडून ९१ हजार ६०१ दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती भरण्यात आली आहे. पण, निकषानुसार केवळ ‘गोकूळ’ दूध संघाच्या ८१ हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाली आहे, त्यातील ७ हजार खात्यांची पडताळणी पूर्ण झाली असून, आगामी चार दिवसात उर्वरित खात्यांची पडताळणी होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यासाठी दुग्ध विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.राज्यात गाय दुधाचे उत्पादन वाढले, त्यात पावडर व बटरला भाव नसल्याने खासगी व सहकारी दूध संघांनी दुधाच्या दरात कपात केली. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला. खासगी दूध संघ तर मनमानी पद्धतीने २२ ते २८ रुपये लीटरने दूध खरेदी करू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने गाय दुधाला प्रती लीटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. हे अनुदान ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी या एक महिन्यासाठीच दिले जाणार होते. त्यासाठी शासनाने ढीगभर अटी घातल्या होत्या. दहा दिवसांच्या दुधाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे, पशुधन टॅगिंग, आदी अटी घातल्या होत्या. त्यानुसार दहा दिवसांची माहिती दूध संस्थांना भरण्यास सांगितले होते. जिल्ह्यात सहकारी व खासगी दूध संघाकडील गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ९१ हजार ६०१ आहे. त्यापैकी एकट्या ‘गोकूळ’कडे ८१ हजार आहे. आतापर्यंत ‘गोकूळ’च्या ७ हजार खातेदारांची माहितीची पडताळणी झाली असून, येत्या चार दिवसात उर्वरित खातेदारांची माहितीची पडताळणी होऊन पैसे खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. ‘वारणा’सह इतर दूध संघांनी शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली असली तरी त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने पहिल्या टप्प्यात त्यांच्या दूध उत्पादकांना पैसे मिळण्याची शक्यता धूसर आहे.ॲपद्वारे माहिती भरल्याने निकषांची चाळण लावूनच येते, त्यानंतर दुग्ध विभाग फक्त कॅशलेस व्यवहाराची तपासणी करून अनुदानाचे प्रस्ताव पाठवणार आहे.
पहिल्या दहा दिवसांचे पैसे मिळणारपहिल्या टप्प्यात ११ जानेवारी ते २० जानेवारी या दहा दिवसातील दुधाचे प्रती लीटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दहा दिवसातील पैसे जमा केले जाणार आहेत.
दूध उत्पादकांनी अचूक व लवकर माहिती भरली तर अनुदान तातडीने मिळू शकते. काही तांत्रिक अडचणी येतात, दुग्ध विभाग दूर करत असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. - प्रकाश आवटी (जिल्हा दुग्धविकास अधिकारी, कोल्हापूर)
असे आहेत संघनिहाय गाय दूध उत्पादक शेतकरी-संघ - शेतकरी संख्यागोकूळ ८१ हजारवारणा ८ हजार १७स्वाभिमानी ॲग्रो ६३४श्री दत्त इंडिया ४१९छत्रपती शाहू १६२विमल डेअरी १०९हॅपी इंडिया १०१श्री स्वामी समर्थ ९१चौगुले मिल्क २१वैजनाथ मिल्क १०