फुटबॉलचा रणसंग्राम १९ पासून
By Admin | Updated: November 9, 2016 01:37 IST2016-11-09T01:36:31+5:302016-11-09T01:37:25+5:30
उत्सुकता वाढली : केएसए ‘ए’ डिव्हीजन लीगने होणार हंगामास प्रारंभ

फुटबॉलचा रणसंग्राम १९ पासून
कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनतर्फे आयोजित के.एस.ए. लीग ‘ए’ डिव्हिजन फुटबॉल स्पर्धा शनिवार (दि. १९ नोव्हेंबर) पासून शाहू स्टेडियमवर सुरू होणार आहे. के.एस.ए. लीग फुटबॉल स्पर्धेपासूनच खऱ्या अर्थाने कोल्हापूर फुटबॉल हंगामास सुरुवात होत असल्याने फुटबॉल खेळाडू व फुटबॉलप्रेमी या लीगची आतुरतेने वाट पाहत असतात.
गतवर्षातील पात्र व नोंदणीकृत एकूण १६ संघांची गतवर्षीच्या मानांकनानुसार पहिले आठ सीनिअर संघ सीनिअर सुपर ८ गटांकरिता पात्र ठरतील, तर बाकी आठ सीनिअर संघ सीनिअर ८ गटांसाठी पात्र ठरणार आहेत. यामधून सीनिअर सुपर ८ गटांमधील गुणानुक्रमे पहिले दोन संघ विजेता व उपविजेता ठरतील व सीनिअर ८ ग्रुपमधील गुणानुक्रमे शेवटचे दोन संघ के.एस.ए. ‘बी’ डिव्हिजनमध्ये याचवर्षी जातील.
पोलिस प्रशासनाकडून
आलेल्या सूचना
स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या फुटबॉल संघाचे नाव, खेळाडू व पदाधिकारी यांच्या नावांची यादी पोलिस ठाण्याकडे के.एस.ए.ने सादर केली आहे. प्रेक्षक गॅलरीत हुल्लडबाजी करणाऱ्या प्रेक्षकांवर लक्ष ठेवण्याकरिता मैदानावर, स्टेडियममध्ये व लगत बाहेरील बाजूस संपूर्ण सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्याचे रेकॉर्डिंग पोलिस ठाण्याकडे देण्यात येईल. तसेच फुटबॉल सामन्यापूर्वी, चालू असताना व संपल्यानंतर खेळाडू, समर्थक व प्रेक्षक यांच्यामध्ये गैरवर्तन झाल्यास त्या सामन्यात खेळणाऱ्या संघाच्या व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल. (प्रतिनिधी)
असे आहेत नियम
लीग सामन्यात एखादा संघ मैदानावर खेळण्यास न आल्यास त्या संघास पुढील सामन्यात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच त्यांचे संपूर्ण लीगमधील झालेले व पुढे होणारे सामने रद्द केले जातील व संघास व खेळाडूस वर्षभर पुढील कोणत्याही सीनिअर सामन्यात खेळण्यास प्रवेश दिला जाणार नाही. तसेच संघास पुढीलवर्षी के. एस. ए. ‘बी’ डिव्हिजन लीगमध्ये खेळावे लागेल.
स्पर्धेमध्ये दोन पिवळे कार्ड दाखविल्यास खेळाडूस लॉटस्प्रमाणे पुढील एक सामन्यात खेळता येणार नाही.
एकाच सामन्यात खेळाडूस दोनवेळा पिवळे कार्ड झाल्यास परिणामी खेळाडूस लाल कार्ड दाखविण्यात येईल. यावेळी सदरच्या खेळाडूस तो खेळत असलेला सामना व लॉटस्प्रमाणे येणारा पुढील एक सामना खेळता येणार नाही.
एखाद्या खेळाडूस डायरेक्ट रेड कार्ड दाखविण्यात आल्यास त्या खेळाडूस चालू सामना व पुढील एक सामना खेळता येणार नाही.
यावर्षी सामना खेळण्यासाठी २० खेळाडूंची यादी घेण्यात येणार असून, यामध्ये ११ खेळाडूंना प्लेर्इंग इलेव्हन म्हणून, तर सात खेळाडूंना सबस्टिट्यूट व दोन खेळाडूंची नॉन-प्लेर्इंग म्हणून नोंद करण्याची आहे.