कोल्हापूरचा फुटबॉल खेळाडू सातासमुद्राकडे जाईल
By Admin | Updated: November 30, 2014 23:58 IST2014-11-30T23:38:01+5:302014-11-30T23:58:20+5:30
मालोजीराजे : ‘केएसए’च्या अमृत महोत्सवानिमित्त बालगोपाल मंडळाच्या फलकाचे उद्घाटन

कोल्हापूरचा फुटबॉल खेळाडू सातासमुद्राकडे जाईल
कोल्हापूर : इतर जिल्ह्यांत फुटबॉल हा खेळ कमी होत असला, तरी कोल्हापुरातील जिगरबाज खेळाडू व स्थानिक फुटबॉल शौकिनांमुळे हा खेळ बहरला आहे. त्यामुळे भविष्यात येथील स्थानिक खेळाडू सातासमुद्राकडे जाईल, अशी अपेक्षा आज, रविवारी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए)च्या अमृतमहोत्सवाच्या प्रारंभानिमित्त ते बालगोपाल तालीम मंडळाच्यावतीने मिरजकर तिकटी चौकात भव्य डिजिटल फलकाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी छत्रपती शाहू महाराज, बालगोपाल तालीमचे अध्यक्ष निवास साळोखे, आदी उपस्थित होते.
मालोजीराजे छत्रपती म्हणाले, ‘केएसए’च्या आजपर्यंतच्या वाटचालीत खेळाडूंबरोबर स्थानिकांचे योगदान आहे. परदेशातील काही खेळाडू भारतात फुटबॉल संघांत आहेत. त्यामुळे येथील स्थानिक खेळाडूही सातासमुद्रापलीकडे कोल्हापूरचा झेंडा रोवतील. इतर जिल्ह्यांत फुटबॉलचा दबदबा कमी होत आहे; पण कोल्हापुरात या खेळाने उंची गाठली आहे. आता फुटबॉलबरोबर स्विमिंग, खो-खो, बॅडमिंटन असे विविध खेळ अमृतमहोत्सवानिमित्त सुरू करण्याचाही मानस आहे.
निवास साळोखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी फुटबॉलपटू माशू मिरशिकार (इंडो बेकरी) यांनी फुटबॉल मैदानाच्या आकारातील चार बाय तीन फुटांचा केक तयार केला होता. छत्रपती शाहू महाराज व मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते तो कापण्यात आला. त्यानंतर फलकाचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू रघू पिसे, लक्ष्मण पिसे, केशव पोवार, बाळासाहेब निचिते, बाळसो बुरटे, माणिक मंडलिक, मेहबूब शिकलगार, लाला गायकवाड, निवास जाधव, चंचल देशपांडे, प्रकाश राऊत, सुरेश पाटील, बाबू घाले, नूरमहमंद देसाई, विश्वास कांबळे, बाबूराव पाटील, संभाजी जाधव यांच्यासह शहरातील उद्योगपती चंद्रकांत जाधव, विनायक साळोखे उपस्थित होते. ‘बालगोपाल’चे राजेंद्र कुरणे, सुनील पिसे, संजय साळोखे, रमेश घाटगे, नंदू सूर्यवंशी, आनंदा नरके, हिंदुराव बारड, सुशांत चव्हाण, सागर भांदिगरे, अशोक पोवार, धनाजी घाटगे, अजिंक्य भोसले, जयवंत साळोखे, अजय पोवार, ओमकार साळोखे, आदींनी केले. (प्रतिनिधी)
डिजिटल फलकांमधून जुन्या स्मृतींना उजाळा...
‘केएसए’चे संस्थापक छत्रपती शहाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह फुटबॉल संघ, छत्रपती फुटबॉल संघ, शिवाजी तरुण मंडळ, बालगोपाल तालीम, प्रॅक्टिस, बाराईमाम या संघांचे १९३१ च्या कारकिर्दीतील फुटबॉल संघांचे छायाचित्र लावून जुन्या स्मृतींना उजाळा दिला आहे.