फौंड्रीच्या कच्च्या मालाचे दर भडकले

By Admin | Updated: August 7, 2014 00:22 IST2014-08-06T23:45:40+5:302014-08-07T00:22:33+5:30

स्क्रॅप तीन हजारांनी महागले : पिग आयर्न प्रतिटन हजार रुपयांनी वाढले, कोळशाचे दर स्थिर

Fondry raw material prices were stirred | फौंड्रीच्या कच्च्या मालाचे दर भडकले

फौंड्रीच्या कच्च्या मालाचे दर भडकले

सतीश पाटील - शिरोली   फौंड्रीला लागणाऱ्या कच्च्या
मालाचे दर वाढले असून, स्क्रॅप तीन हजारांनी, तर पिग आयर्न प्रतिटनामागे हजार रुपयांनी वाढले आहे.
कोळशाचे दर मात्र सध्या तरी स्थिर आहेत.पिग आयर्नचा पूर्वीचा दर प्रतिटन २८ हजार होता, तो आता ३० हजारांवर पोहोचला आहे. स्क्रॅपचा दर प्रतिटन २८ हजारांवरून ३१ हजारांवर पोहोचला आहे. सध्या सेसा गोवा आणि बारामतीची सोना अलॉय या दोनच कंपन्यांकडून पिग आयर्नचा पुरवठा महाराष्ट्रातील उद्योगांना होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मंदी असल्याने स्क्रॅपची आवक कमी झाली आहे. सिलिका सॅँडही कोकणातून फोंडा कासार्डे येथून व मंगलोर (कर्नाटक) मधून येते. पावसाळा असल्याने ही सिलिका ओली येते त्यावर प्रक्रिया करून विकली जाते. त्यामुळे सिलिका सॅँडचेही दर पावसाळ्यात वाढलेले आहेत. अलॉईज व रासायनिक केमिकलचेही दर वाढले आहेत. पण, कोळशाचे दर सध्यातरी स्थिर आहेत.
कच्च्या मालाचे दर वाढले आहेत; पण आंतरराष्ट्रीय कंपन्या फौंड्रीतील तयार होणाऱ्या कास्टिंगचा मात्र दर वाढवून देत नसल्याने उद्योजक संकटात सापडले आहेत.
कोल्हापुरात २५० फौंड्री उद्योग आहेत. महिन्याला सुमारे ५० हजार टन कास्टिंग तयार होते. हे कास्टिंग तयार करण्यासाठी महिन्याकाठी पिग आयर्न १५ हजार टन, स्क्रॅप दहा हजार टन, कोळसा दहा हजार, तर सिलिका सॅँड ४५ हजार टन लागते. या दरवाढीमुळे फौंड्री उद्योगाला फटका बसला आहे.

पिग आयर्न व स्क्रॅप दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पिग आयर्नचा कोकणातील रेड्डी येथील टाटाचा व गोव्यातील साळगावकर यांचा प्रकल्प बंद पडल्याने पिग आयर्नचे प्रमाण कमी झाले. तसेच स्क्रॅप पूर्वीसारखा आयात होत नाही. त्यामुळे स्क्रॅपचेही दर तीन हजारांनी वाढले आहेत. याचा फटका उद्योगांना बसला आहे. - एम. पी. शेख, उद्योजक

कच्च्या मालाचे दर गेल्या महिन्यापासून वाढलेले आहेत. टाटा, महिंद्रासारख्या कंपन्यांकडून स्क्रॅप उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्क्रॅपचा तुटवडा आहे. पिग आयर्न, सिलिका सॅँड, फेरा अलाईज यांचे दरही वाढल्याने उद्योग चालविणेच कठीण झाले आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या कास्टिंगचे दर वाढवून देऊ शकत नाहीत. त्यामुळे फौंड्री उद्योग संकटात आहे. - सतीश रायबागे, उद्योजक

Web Title: Fondry raw material prices were stirred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.