नियम पाळून फळे, भाजीपाल्याची विक्री करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST2021-05-24T04:23:59+5:302021-05-24T04:23:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आज, सोमवारपासून भाजीपाला, फळांची विक्री सुरू होत आहे. सामाजिक ...

नियम पाळून फळे, भाजीपाल्याची विक्री करा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आज, सोमवारपासून भाजीपाला, फळांची विक्री सुरू होत आहे. सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर करत सर्व नियमांचे पालन करून सौदे पूर्ण करा, अशा सूचना पोलिसांनी समितीमधील व्यापारी, अडत्यांना रविवारी दिल्या.
आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर आजपासून अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू होत आहे. बाजार समितीत भाजीपाल्याच्या सौद्यावेळी गर्दी हाेते. त्यामुळे पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना पोलिसांना दिली आहे. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी समितीमधील व्यापारी, अडते व समिती प्रशासनासोबत बैठक घेतली. यामध्ये सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, वाहनांचे पार्किंग नेमून दिलेल्या ठिकाणीच करणे आदी सूचना पोलिसांनी केल्या. त्याचे पालन करा ,अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कुरके, महापालिकेचे उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, समितीचे सचिव जयवंत पाटील, उपसचिव राहुल सूर्यवंशी, भाजीपाला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जमीर बागवान, नईम बागवान, सलीम बागवान, जहांगीर पन्हाळकर आदी उपस्थित होते.
पास बघूनच प्रवेश
समितीने खरेदीदारांना पास दिले आहेत. त्यानुसारच मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे. सौद्याच्या वेळेत पासशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
फोटो ओळी : बाजार समितीमध्ये आजपासून भाजीपाल्याचे सौदे सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याबाबत रविवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात खरेदीदार, समिती प्रशासनाची बैठक घेण्यात आली. (फाेटो-२३०५२०२१-कोल-बाजार समिती)