उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा

By Admin | Updated: August 31, 2015 23:31 IST2015-08-31T23:31:35+5:302015-08-31T23:31:35+5:30

पी. शिवशंकर यांचे आवाहन : सार्वजनिक गणेशोत्सव मंडप, ध्वनिप्रदूषण रोखण्याबाबत मंडळासोबत प्रशासनाची बैठक

Follow the order of the High Court | उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा

कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सवप्रसंगी उभारण्यात येणारे मंडप आणि ध्वनिप्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन सार्वजनिक तरुण मंडळांनी करावे, असे आवाहन कोल्हापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले. शहरातील गणेशोत्सव मंडळांना मंडप, ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमावलीविषयी माहिती देण्यासाठी महापालिका प्रशासनाने स्थायी सभागृहात सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. पी. शिवशंकर म्हणाले, उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्यांचे महापालिका तंतोतंत पालन करणार आहे. यासाठी तहसीलदार करवीर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती पाहणी करणार आहे. जी मंडळे या निर्देशांचे पालन करणार नाहीत त्या मंडळांवर पोलीस प्रशासनामार्फत कडक कारवाई केली जाईल. यावेळी जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी यांनी नियमावली वाचून दाखविली, तर मंडप व्यावसायिक प्रशांत मंडलिक यांनी मुख्य रस्ता आणि अंतर्गत रस्त्यावरील मंडप उभारणीसाठी नियम एकच आहेत का, अशी विचारणा केली तर सुहास भेंडे यांनी ‘एक खिडकी योजना’ची मागणी केली.शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे पोलीस निरीक्षक एम. बी. साखळे यांनी मंडळांसाठी शहर उपअधीक्षक कार्यालयातर्फे आज, मंगळवारपासून हरकत दाखल्यांसाठी एक खिडकी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. बैठकीस तहसीलदार योगेश खरमाटे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, हर्षजित घाटगे, पर्यावरण अभियंता पाटील उपस्थित होते.

मंडप उभारणीसाठी जाहीर केलेली आचारसंहिता
मंडळाचा मंडप रस्त्याच्या १/४ भागापेक्षा अधिक असू नये
२५ फूट रस्त्यासाठी ६.२५ फूट कमाल रूंदी, तर १८.७५ मोकळी जागा असली पाहिजे, तर ५० फुटांसाठी १२.५ फूट रुंदी, मोकळी जागा ३७.५ फूट हवी. ७० फूट रस्त्यासाठी १७.५ फूट रुंद, तर ५२.५ फूट मोकळी जागा हवी.
शहर वाहतूक, पोलीस स्टेशन व महापालिका अतिक्रमण विभागाचा ना हरकत दाखला आवश्यक.
रस्त्याच्या आवश्यकतेनुसार मंडप कमी-जास्त करण्याचा अधिकार महापालिकेकडे अबाधित ठेवला आहे.
महापालिकेच्या परवानगीनुसारच मंडप उभारणे बंधनकारक आहे. पालन न केल्यास कडक कारवाई केली जाणार.
के.एम.टी. बसमार्गावर १२ फूट रूंद जागा हवी.
८ फूट रस्त्यावर मंडप उभारणी करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
मंडळांनी रितसर पैसे भरूनच विद्युत कनेक्शन घ्यावे, महापालिकेच्या खांबावरून कनेक्शन घेतल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई .
मंडप उभारताना डीपी बॉक्स, विद्युत तार यांच्यात किमान ६ फूट अंतर हवे.
मंडपापासून १५ मीटर अंतरापर्यंत विद्युत रोषणाईस परवानगी.
मंडपाच्या आसपास रस्ता पोलिसांच्या परवानगीशिवाय बंद करता येणार नाही.
नवीन डांबरीकरण, सिमेंट रस्त्यावर खुदाई करता येणार नाही. लोखंडी फॅब्रिकेशन साच्यांमध्ये मंडप उभारण्यास हरकत नाही.
परवानगीशिवाय कमान, शुभेच्छा फलक उभारता येणार नाहीत. अनधिकृत कमानी उभारल्यास मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांवर जबाबदारी निश्चित करून गुन्हे दाखल केले जाणार.
रस्त्यावर मंडप कमीत कमी पाच दिवस, तर जास्तीत जास्त १५ दिवस उभारता येणार.
ध्वनिप्रदूषणाबाबतही कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५, तर रात्री ७०, वाणिज्यकमध्ये दिवसा ६५, तर रात्री ५५ आणि निवासी क्षेत्रात दिवसा ५५, तर रात्री ४५ व शांतता क्षेत्रात दिवसा ५०, तर रात्री ४० डेसिबल इतकी आवाजाची तीव्रता हवी. अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार आहे.

मंडळांचा बैठकीस अल्प प्रतिसाद
कोल्हापूर शहरात पाचशेहून अधिक मंडळे असताना या बैठकीस या मंडळापैकी शिवाजी चौक तरुण मंडळ, राधाकृष्ण तरुण मंडळ ट्रस्ट, निर्माण तरुण मंडळ, गोल सर्कल तरुण मंडळ, डांगे गल्ली तरुण मंडळ, तेली गल्ली मित्र मंडळ, मंगेशकर नगर तरुण मंडळाचे प्रतिनिधीच उपस्थित होते.

Web Title: Follow the order of the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.