मृत्यूच्या दाखल्यासाठी नातेवाईकांची उडते तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST2021-04-14T04:22:00+5:302021-04-14T04:22:00+5:30
कोल्हापूर : कोविडने मृत्यू झाल्यास सरकारी यंत्रणेकडूनच पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात परंतु तोच एखाद्या कोरोना नसलेल्या रुग्णाचा घरीच ...

मृत्यूच्या दाखल्यासाठी नातेवाईकांची उडते तारांबळ
कोल्हापूर : कोविडने मृत्यू झाल्यास सरकारी यंत्रणेकडूनच पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात परंतु तोच एखाद्या कोरोना नसलेल्या रुग्णाचा घरीच नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळविताना नातेवाईकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. मंगळवारी सकाळी देवकर पाणंदमधील एका कुटुंबाला अशाच अडचणींना सामोरे जावे लागले. तब्बल दोन-अडीच तास प्रयत्न केल्यानंतर अखेर आयसोलेशन रुग्णालयाकडूनच प्रमाणपत्र मिळाले.
घडले ते असे : या ज्येष्ठ नागरिकांचे किडनीच्या आजाराने पहाटे निधन झाले. त्यांच्यावर महावीर महाविद्यालयांजवळील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात मागील आठवड्यात उपचार करण्यात आले होते. त्यामुळे निधन झाल्यावर कुटुंबीयांनी त्यांच्याकडे वैद्यकीय फाईल दाखवून मृत्यू प्रमाणपत्राची विनंती केली; परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अन्य चार ते पाच खासगी डॉक्टर्सना संपर्क साधण्यात आला; परंतु आम्ही रुग्णाला पाहिले नसल्याने मृत्यू प्रमाणपत्र कसे देणार, अशी विचारणा करून त्यांनी असमर्थता दाखविली. त्यामुळे अंत्यसंस्कारासही तास-दीड तास विलंब झाला. अखेर आयसोलेशन रुग्णालयाशी संपर्क साधण्यात आला. तिथे कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मग साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रमाणपत्र मिळाले. शेवटी महापालिकेचीच यंत्रणा अखेरच्या घटकेलाही उपयोगी पडल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.
------
ही लागतात कागदपत्रे
महापालिकेच्या आयसोलेशन किंवा अन्य कोणत्याही दवाखान्यातून मृत्यूचा दाखला हवा असल्यास ज्या व्यक्तीचे निधन झाले आहे, त्याच्या आधारकार्डची झेरॉक्स व त्यांच्या कुटुंबीयांच्या संबंधित व्यक्तीची आधारकार्ड झेरॉक्स जोडून अर्ज दिल्यानंतर त्या दवाखान्यातून वैद्यकीय अधिकारी निधन झालेल्या व्यक्तीच्या घरी येतात व तपासणी करून मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र देतात; परंतु व्यक्तीचे निधन रात्री-अपरात्री झाल्यावर झेरॉक्सपासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.