गॅसवर फुली, पुन्हा पेटल्या चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST2021-03-26T04:24:00+5:302021-03-26T04:24:00+5:30

कोल्हापूर : दर महिन्याला वाढत जात असलेले गॅस सिलिंडरचे दर, बंद झालेले अनुदान आणि वाढती महागाई यामुळे कष्टकऱ्यांच्या घरात ...

Flowers on gas, stoves lit again | गॅसवर फुली, पुन्हा पेटल्या चुली

गॅसवर फुली, पुन्हा पेटल्या चुली

कोल्हापूर : दर महिन्याला वाढत जात असलेले गॅस सिलिंडरचे दर, बंद झालेले अनुदान आणि वाढती महागाई यामुळे कष्टकऱ्यांच्या घरात महिलांनी गॅसवर फुली मारत पुन्हा एकहा चुली पेटवायला सुरुवात केली आहे. महिलांना चुलीपासून मुक्ती मिळावी, त्यांचा वेळ वाचावा म्हणून वाजत-गाजत राबविण्यात आलेल्या उज्ज्वला योजनेनंतर सरकारने दरवाढ करून खिशाला अशी काही कात्री लावली की, हे आमच्यासारख्या गोरगरिबाचं काम न्हाई...शेणी, लाकडं आणि चुलीच परवडल्या असं म्हणण्याची वेळ महिलांवर आली आहे.

गत निवडणुकीत मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर मोठा गाजावाजा करीत उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात आली. त्यावेळी सिलिंडरचा दर होता ३०० रुपये. त्यावेळी महागाईही कमी होती. आता मात्र गेल्या महिन्याभरात गॅस सिलिंडरचा दर शंभर रुपयांनी, तर गेल्या वर्षभरात तीनशेहून अधिक रुपयांनी वाढला आहे. त्यात इंधनाचे दर वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढले. जिथे रोजच्या भाकरीचे वांदे व्हायला लागले तिथे साडेआठशे रुपये घालून गॅस सिलिंडर घेण्याची परिस्थिती गोरगरिबांची राहिली नाही. परिणामी शेगडी आणि सिलिंडर दोन्ही बाजूला ठेवून ग्रामीण भागातील महिलांनी पुन्हा चूल पेटविली आहे.

---

सिलिंडरचे वाढलेले दर असे

जून २०२० : ५९५

डिसेंबर २०२० : ६४७

जानेवारी २०२१ : ६९७.

फेब्रुवारी : ७२२

मार्च : ८२२

---

उज्वला गॅस योजनेअंतर्गत दिलेले कनेक्शन

एचपीसी : ९६ हजार ४७५

एलओसी : ३६ हजार ४५०

बीपीसी : ३८ हजार ३११

एकूण : १ लाख ७१ हजार २३६

--

फुकट गॅस म्हणून आम्हाला उज्वला योजनेतून तीन वर्षांपूर्वी गॅस कनेक्शन मिळाला तेव्हा ३०० रुपये सिलिंडर होता. आता ९०० रुपयांवर गेलाय, त्याच्यावरच एवढे पैसे घालायचे म्हटल्यावर खायचं काय, सिलिंडर आता गोरगरिबाचं काम राहलं न्हाई. नोकरी-धंद्यावाल्यांना ते परवडतंय. आता चहा करण्यापुरता सिलिंडर ठेवलाय. जेवण सगळं चुलीवरच बनवायला सुरू केलं.

विमल पाटील (तिरवडे, ता. भुदरगड)

-

मी भंगार गोळा करते, त्यातनं किती कमाई मिळणार त्यात भाड्याचं घर. एवढ्या पैशात घर चालवायचं, पोरांचं शिक्षण करायचं, घरभाडं भरायचं का गॅस सिलिंडर घ्यायचा. सिलिंडर मिळाला म्हणून रॉकेल द्यायचं बंद केलं. कितीदा तर पाणी पिऊन झोपलोय. सकाळच्या पारी लाकडं गोळा करून चूल पेटवते. मिळतंय तेवढ्यावर भूक भागवतो, सिलिंडरचं सोंग आम्हाला नाही परवडायचं.

बायाबाई लाखे (लाखे नगर, गडहिंग्लज)

--

लॉकडाऊनमध्ये नवऱ्याचं काम गेलं, मी धुणी-भांडीचं काम करते. सिलिंडर परवडत नाही म्हणून वखारीतनं लाकडं आणून चूल पेटवते. ते पण आता महाग झालंय. झाडं तोडू देत नाहीत. अच्छे दिन तर काय बघायला मिळालेच नाही उलट जगणं मुश्कील झालंय.

संगीता माने (गडहिंग्लज)

--

Web Title: Flowers on gas, stoves lit again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.