लोकसभेचा दारूचा पूर विधानसभेत ओसरला

By Admin | Updated: October 17, 2014 00:52 IST2014-10-17T00:48:48+5:302014-10-17T00:52:09+5:30

सरासरी विक्रीत केवळ ५० हजार लिटरची वाढ

The floods of the Lok Sabha passed away in the Legislative Assembly | लोकसभेचा दारूचा पूर विधानसभेत ओसरला

लोकसभेचा दारूचा पूर विधानसभेत ओसरला

एकनाथ पाटील - कोल्हापूर -सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल २० लाख लिटर दारूची विक्री झाली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणूक काळात ही विक्री पाचपटींनी वाढेल, असा उत्पादन शुल्क विभागाचा अंदाज होता; परंतु तो फोल ठरला. महिन्याला नऊ लाख लिटर दारूच्या होणाऱ्या विक्रीमध्ये फक्त ५० हजार लिटरची वाढ झाली. यावरून लोकसभा निवडणुकीत आलेला दारूचा पूर बहुरंगी आणि चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र ओसरला, असे दिसून आले.
ग्रामपंचायतीपासून ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. जिल्ह्यात देशी-विदेशी दारूची महिन्याला नऊ लाख लिटर विक्री होते. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या २० दिवसांत २० लाख लिटर दारू रिचवली गेली. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका आल्याने व त्या प्रस्थापित उमेदवारांच्या प्रतिष्ठेच्या असल्याने दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज उत्पादन शुल्क विभागाला होता. त्यासाठी त्यांनी गोव्याहून येणाऱ्या चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवून दारूची तस्करी रोखली.
जिल्ह्यात परवानाधारक दारूचे चार कारखाने आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहरात मार्केट यार्डमध्ये दोन, कबनूर (ता. कागल) येथे दोन आहेत. जिल्ह्यात होलसेल विक्रेते १५, तर मोठे किरकोळ विक्रेते आठ आहेत. येथून ही दारू कोल्हापूरसह सांगली व सातारा या ठिकाणी विक्रीसाठी जात असते. जिल्ह्यातील परवानाधारक ३२५ देशी दारूची दुकाने आहेत. तर ३५० बीअर बार आहेत. त्यानुसार महिन्याला नऊ लाख लिटर दारूची विक्री केली जाते. वर्षाला दारूच्या उत्पादनातून प्रशासनाला १४५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो.
लोकसभा निवडणुकीत दारूची प्रचंड विक्री झाल्याने उत्पादन शुल्क विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र दारूचा पूर ओसरल्याने जादा महसूल बुडाला. गोव्याहून येणाऱ्या चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवर सुमारे १८ लाखांची दारू पकडण्यात आली. त्यामध्ये तस्करीबहाद्दरांवर २८९ गुन्हे दाखल करून ४६ जणांना अटक केली.

विधानसभा निवडणूक काळात देशी-विदेशी दारूची तस्करी रोखण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले. लोकसभा निवडणुकीमध्ये परवानाधारक दारूची विक्री मोठ्या प्रमाणात झाली होती. विधानसभा निवडणुकीत मात्र ती अत्यंत कमी झाली.
- राजेश कावळे : अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर

दारूची विक्री कमी झाल्याने महसुलात घट
१८ लाखांची दारू जप्त
१८९ जणांवर गुन्हे
४६ आरोपींना अटक

Web Title: The floods of the Lok Sabha passed away in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.