आधारकार्डप्रकरणी झाडाझडती
By Admin | Updated: February 25, 2015 00:45 IST2015-02-25T00:41:40+5:302015-02-25T00:45:16+5:30
एजन्सीधारक, केंद्रचालक, अधिकाऱ्यांना सूचना : टोकन पद्धतीने आधारकार्ड काढण्यास सुरुवात

आधारकार्डप्रकरणी झाडाझडती
इचलकरंजी : आधारकार्ड काढण्याच्या प्रक्रियेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी येथील प्रांत कार्यालयात बैठक झाली. बैठकीत प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे आणि तहसीलदार दीपक शिंदे यांनी आधारकार्ड एजन्सीधारक, आधार केंद्रचालक व अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. त्यामुळे आज, बुधवारपासून सतर्कतेने आधारकार्ड काढण्याची यंत्रणा सुरळीत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
शहर व परिसरात गेल्या दहा दिवसांपासून आधारकार्ड काढण्याच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व प्रांताधिकारी यांनी वेळोवेळी बैठका घेऊन संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या. त्यानंतर आमदार सुरेश हाळवणकर यांनी संबंधित संपूर्ण यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन केंद्र शासनाची योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात सूचना दिल्या. तरीसुद्धा आधारकार्ड काढणाऱ्या यंत्रणेने सावळा-गोंधळ सुरूच ठेवला. परिणामी रास्ता रोको, मोर्चे, आंदोलने सुरू झाली. त्यामुळे पुन्हा खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्याची आधारकार्ड काढण्याची जबाबदारी दिलेल्या स्पॅनको कंपनीच्या जिल्हा एजंट गुरुप्रसाद व भास्कर पाटील यांना बोलावून घेतले. त्यांच्यासोबत इचलकरंजी व परिसराचा एजंट विनायक पाटील व अन्य आधार केंद्र चालकांची बैठक घेतली. या बैठकीत कडक सूचना देऊन आजपासून आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचे आदेश दिले. यामध्ये आजपासून शहरात सात ठिकाणी व उद्यापासून पाच ठिकाणी असे एकूण बारा ठिकाणी आधार कार्ड काढण्याचे काम टोकन पद्धतीने सुरू होणार आहे. त्यामुळे केंद्रावर जाणाऱ्या नागरिकाला त्यांचे आधार कार्ड नेमक्या कोणत्या दिवशी काढले जाईल, याचे टोकन दिले जाणार आहे. त्याप्रमाणे आधार कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिरंगे यांनी केले. (प्रतिनिधी)
दोघा एजंटांवर कारवाईचे प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
इचलकरंजी : आधार कार्ड काढण्याच्या यंत्रणेत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी आधार कार्ड एजंट विनायक पाटील व कांबळे यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे आदेश मंडल अधिकारी व तलाठी यांना दिले. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत गावभाग पोलिसांत सुरू होते.
शहरात आधार कार्ड काढण्याचा गोंधळ उडाला असून, याप्रकरणी संबंधित यंत्रणेची झाडाझडती घेण्यासाठी मंगळवारी प्रांत कार्यालयात बैठक झाली.
या बैठकीत सोमवारी सील करण्यात आलेल्या केंद्रचालकांवर पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे आदेश सर्कल अधिकारी व्ही. जी. कोळी व तलाठी अनंत दांडेकर यांना प्रांताधिकारी जिरंगे यांनी दिले. त्यानुसार मोफत आधार कार्ड काढून देण्याची योजना असतानाही नागरिकांकडून पैसे घेतले व शासकीय कामात गोंधळ निर्माण केला. याबाबत चौकशी करून कारवाई करावी, अशा स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत गावभाग पोलीस ठाण्यात सुरू होते. दरम्यान, या कारवाईची चाहूल लागल्याने पाटील यांने आपले पाच मशीनसह शहरातून पलायन केल्याची चर्चा सुरू होती.