बाजारभोगाव परिसरात दारूचा महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:24 IST2021-05-11T04:24:37+5:302021-05-11T04:24:37+5:30
कळे पोलिसांसमोर मोठे आव्हान लोकमत न्यूज नेटवर्क बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव परिसरातील बाजारभोगाव, काऊरवाडी, किसरूळ, काळजवडे, पिसात्री, खापणेवाडी, ...

बाजारभोगाव परिसरात दारूचा महापूर
कळे पोलिसांसमोर मोठे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव परिसरातील बाजारभोगाव, काऊरवाडी, किसरूळ, काळजवडे, पिसात्री, खापणेवाडी, गुरववाडी व वाशीसह अनेक छोट्या वाड्यावस्त्यावर अवैधरित्या दारूची विक्री जोमाने चालू आहे. मात्र कळे पोलिसांना हे माहीत नाही का? असा संतापजनक सवाल बाजारभोगाव परिसरातील नागरिकांमधून बोलला जात आहे.
कोरोना संसर्गाचा फायदा घेऊन दारू विक्रेते मालामाल झाले असून तरुणाई मात्र कंगाल झाली आहे. संत्र्याच्या एका बॉक्सची ३५०० ते ४००० रुपये दराने दुकानदार व अवैध दारू विक्री करणारे विक्रेते करत असल्याने ग्रामीण भागात १५० रुपये दराने देशीची विक्री केली जात आहे.त्यामुळे पोलीस यंत्रणा मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
संचारबंदीत विक्रेते मालामाल मात्र
तरुणाई कंगाल!
संचारबंदीचा फायदा घेऊन विक्रेते १५० रुपये दराने देशी व ३०० रुपये दराने इंग्लिश दारूची विक्री करत आहेत, मात्र लॉकडाऊन असताना दारूची खुलेआम वाहतूक नेमकी कोण करतंय ! हा प्रश्न मात्र चिंतनीय असल्याचे बोलले जात आहे.
बाजारभोगाव परिसरातील अनेक कुटुंबातील स्त्रिया १०० रुपये रोजगार करून आपल्या कुटुंबीयांचा सांभाळ करत आहेत मात्र व्यसनाच्या आहारी गेलेले कित्येक तरुण दिवसभर शेतात राब-राब राबून बायकोनं मिळवलेली १००रुपयांची नोट दारूची नशा येण्यासाठी तिला मारझोड करून नेताना दिसत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.