निवास साळोखे-टोल कर्मचाऱ्यांत चकमक
By Admin | Updated: December 7, 2014 00:55 IST2014-12-07T00:53:20+5:302014-12-07T00:55:30+5:30
शाहू टोल नाक्यावरील घटना : प्रकार झाला नसल्याचा पोलिसांचा दावा

निवास साळोखे-टोल कर्मचाऱ्यांत चकमक
कोल्हापूर : टोल न देण्यावरून शाहू टोलनाक्यावर सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे व कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन दमदाटीचा प्रकार काल, शुक्रवारी रात्री घडला.
याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित अजित सुधाकर देवकर (वय २१, रा. शास्त्रीनगर) याचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे हे कुटुंबीयांसमवेत चारचाकीमधून निपाणी येथे कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपून ते कोल्हापूरला काल रात्री येत होते. ही गाडी शाहू टोलनाक्यावर आल्यावर कर्मचाऱ्यांनी साळोखे यांच्याकडे टोलची मागणी केली, पण साळोखे यांनी टोल देण्यास नकार दिला. दरम्यान, साळोखे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित अजित देवकर याला ताब्यात घेतले. हा प्रकार समजताच टोलविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आले. त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. पोलिसांनी संशयितांची चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज पाहिले. पण, त्यामध्ये असा प्रकार झाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी संशयिताला सोडून दिले.
दरम्यान, या प्रकाराबाबत निवास साळोखे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, टोलवरून वादावादी झाली. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. परंतू, याबाबतची तक्रार पोलिसांकडे तोंडी स्वरूपात केली होती.