‘एमपीएससी’त कोल्हापूरचा झेंडा
By Admin | Updated: April 6, 2015 01:13 IST2015-04-06T01:12:59+5:302015-04-06T01:13:19+5:30
निकाल जाहीर : कोलोलीचा विजय जाधव, खुपिरेचा भारत चौगुले प्रथम

‘एमपीएससी’त कोल्हापूरचा झेंडा
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राजपत्रित अधिकारी ‘वर्ग एक’ आणि ‘वर्ग दोन’च्या पदांसाठी झालेल्या राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल रविवारी सायंकाळी जाहीर झाला. त्यात कोल्हापुरातील आठ आणि सांगली जिल्ह्यातील दोन अशा एकूण दहा उमेदवारांनी यशाचा झेंडा फडकाविला आहे. त्यात कोल्हापुरातील कोलोली (ता. पन्हाळा) येथील विजय विलास जाधवने नायब तहसीलदार, तर खुपिरे (ता. करवीर) येथील भारत बबन चौगुलेने गटविकास अधिकारी (बीडीओ) परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
राज्यसेवा मुख्य परीक्षा जून २०१४ मध्ये झाली. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये मुलाखती होऊन परीक्षेचा रविवारी अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यातील नायब तहसीलदारपदाच्या परीक्षेत कोल्हापुरातील मोहिते कॉलनीतील सुशांत डी. कांबळे यांनी २२ व्या, संभाजीनगरमधील विक्रमादित्य दीपक घाटगेने ३८ व्या आणि म्हारूळ (ता. करवीर) येथील अशोक कृष्णा कुंभारने ५१ व्या क्रमांकाने यश मिळविले तसेच पन्हाळा येथील हरीश गुरव यशस्वी ठरला आहे.
सहायक परिवहन अधिकारीपदाच्या परीक्षेत वासुंबेच्या (ता. तासगाव, जि. सांगली) विजय तानाजी पाटीलने प्रथम क्रमांकाने यश मिळविले. गटविकास अधिकारीपदाच्या परीक्षेत मांगूर (ता. चिकोडी) येथील अमोल श्रीधर जाधवने राज्यात आठवा क्रमांक मिळविला. सहायक निबंधकपदाच्या परीक्षेत कामेरी (ता. वाळवा) येथील
रणजित महादेव पाटीलने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यासह हसूर दुमाला (जि. कोल्हापूर) येथील प्रशांत शिवाजीराव पाटील यशस्वी झाला आहे. पोलीस उपअधीक्षकपदाच्या परीक्षेत किसरुळ (ता. पन्हाळा) येथील प्रिया नानासाहेब पाटील २२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. परीक्षेत ए. बी. फौंडेशनच्या आठ आणि कोल्हापुरातील स्टडी सर्कलच्या दहा विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यशस्वी उमेदवारांवर अनेकांनी भेटून, मोबाईलद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला.