गडहिंग्लजच्या ‘शिवराज’चा झेंडा
By Admin | Updated: September 4, 2015 23:28 IST2015-09-04T23:28:45+5:302015-09-04T23:28:45+5:30
आंतरविभागीय क्रॉसकंट्री : तीन जिल्ह्यांतील २९४ खेळाडूंचा सहभाग

गडहिंग्लजच्या ‘शिवराज’चा झेंडा
बोरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधसागर महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठात आंतरविभागीय क्रॉसकंट्री स्पर्धेत गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयाने सर्वसाधारण पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांतील १९७ पुरुष स्पर्धक व ९७ महिला स्पर्धकांनी भाग घेतला. वैयक्तिक क्रॉसकंट्रीतील पहिल्या नऊ पुरुष व सहा महिला खेळाडूंची निवड मंगलोर (कर्नाटक) येथे क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी पुरुष खेळाडूंसाठी साडेबारा कि.मी. तर महिला खेळाडूंसाठी सहा कि.मी.चा बिद्री महाविद्यालय, सोनाळी, पिराचीवाडी फाटा, सोनाळी तलाव, परत बिद्री महाविद्यालय असा मार्ग होता. सांघिक गटामध्ये गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयाने प्रथम वाईच्या के. व्ही. महाविद्यालयाने द्वितीय, तर हलकर्णीच्या वाय. सी. महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला. महिला क्रॉसकंट्रीमध्ये शिवराज महाविद्यालय गडहिंग्लजने प्रथम, नेसरीच्या टी. के. कोलेकर महाविद्यालयाने द्वितीय, तर जयसिंगपूरच्या जी. के. जी. घोडावत कन्या महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला.वैयक्तिक विजेते असे : भैरवनाथ नारायण यादव (आर्टस्, कॉमर्स कॉलेज, सातारा-प्रथम), अमित रमेश पाटील (शिवराज महा. गडहिंग्लज- द्वितीय), आकाश तुकाराम कडूकर (शिवराज महा. गडहिंग्लज), महिला विभाग : सारिका उत्तम देसाई (पी. व्ही. पी. महा., कवठेमहंकाळ-प्रथम.) स्नेहल कुमार लोंढे (एन. डी. पाटील नाईट कॉलेज सांगली-द्वितीय), पद्मा साताप्पा कारंडे (भोगावती महा. कुरुकली). स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार नामदेवराव भोईटे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवाजी विद्यापीठ क्रीडा प्रमुख पी. टी. गायकवाड, प्राचार्य डॉ. आर. एल. राजगोळकर, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. एन. डी. पाटील, निवड समिती सदस्य आय. एम. मुल्ला, प्रा. शीला मोहिते, स्पर्धा निरीक्षक प्रा. कांचन वल्लद, आदी उपस्थित होते. बिद्री महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विजेत्यांना दुधसाखर ट्रॉफी देण्यात आली.
प्रा. डॉ. ए. जे. वारके यांनी आभार मानले. (वार्ताहर)