बंदोबस्तासाठी साडेपाच हजार पोलिसांचा ताफा
By Admin | Updated: October 12, 2014 01:06 IST2014-10-12T01:05:16+5:302014-10-12T01:06:23+5:30
जिल्ह्यात १२९ संवेदनशील मतदारसंघ; अहमदाबाद, लखनौ, भोपाळ, गुजरात येथून राज्य राखीव दलाचे जवान दाखल

बंदोबस्तासाठी साडेपाच हजार पोलिसांचा ताफा
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी (दि. १५) होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्वत्र नाकाबंदीसह वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात १२९ संवेदनशील मतदारसंघ आहेत. निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी बाहेरून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली असून, सुमारे साडेपाच हजार पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत.
अहमदाबाद, लखनौ, भोपाळ, पश्चिम बंगाल, गुजरात येथून राज्य राखीव दलाचे सुमारे दोन हजार पोलीस काल, शुक्रवारी कोल्हापुरात दाखल झाले. सर्व पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिले.
इचलकरंजी, कोल्हापूर दक्षिण, जयसिंगपूर, कागल, मुरगूड, शाहूवाडी, कोडोली, पन्हाळा, आदी ठिकाणी राज्य राखीव दलाच्या दोन-दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. शहरातील शिरोली, तावडे हॉटेल, कावळा नाका, शाहू नाका, शिवाजी पूल, शिये, कसबा बावडा, दसरा चौक, कळंबा नाका, वाशी नाका, सायबर चौक, फुलेवाडी, उमा टॉकीज, गंगावेश, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, माउलीचा पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक, आदी ठिकाणी पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक नाक्यावर व चौकात पोलिसांचे पथक खडा पहारा देत आहे. या संपूर्ण तपासणीचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. साध्या वेशातील पोलीस फेरफटका मारीत हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.