पाच हजारजणांनी केला सूर्यनमस्कार
By Admin | Updated: February 22, 2015 01:04 IST2015-02-22T01:04:24+5:302015-02-22T01:04:48+5:30
जयसिंगपुरात आयोजन : सूर्यनमस्कार, प्रज्ञासंवर्धन महाकुंभची सांगता

पाच हजारजणांनी केला सूर्यनमस्कार
जयसिंगपूर : गीता परिवार व कोल्हापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यावतीने येथील जयसिंगपूर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित सूर्यनमस्कार व प्रज्ञासंवर्धन महाकुंभात शनिवारी पाच हजारजणांनी सहभाग घेतला. सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी होते. या उपक्रमास शिरोळ तालुक्यातील ६१ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
सूर्यनमस्कार हा उपक्रम निश्चितच वाखाणण्यासारखा आहे. बुद्धीचा विकास, कार्य याला चालना देणारा गीता परिवाराचा जयसिंगपूर- मधून सुरू झालेला हा प्रयोग भारतभर पोहोचेल, असा विश्वास मालपाणी यांनी व्यक्त केला. केंद्र शासनाकडे या उपक्रमाबाबतचा प्रस्ताव देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापूर माध्यमिक शिक्षक विभागाचे उपसंचालक एम. के. गोंधळी म्हणाले, गीता परिवार हे संस्काराचे केंद्र आहे. सूर्यनमस्कारातून होणारी मनाची एकाग्रता ही काळाची गरज असून, शाळेतील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला निश्चितच चालना शिक्षण मिळणार आहे.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आबासाहेब सूर्यवंशी यांनी स्वागत केले. गीता परिवाराच्या अध्यक्षा प्रमिला माहेश्वरी यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी नगराध्यक्षा सुनीता खामकर, माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर, विनोद घोडावत, राजकुमार पाटील, पद्माकर पाटील, शैलेश सूर्यवंशी, डॉ. शिरीष रणभिसे, दीपक बियाणी, अशोक सारडा, आबासाहेब सूर्यवंशी, बी. बी. गुरव, मनीषा पाटील, कांतीलाल मालू, एस. आर. कळसापनावर, आदी उपस्थित होते. स्नेहल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश पाटील यांनी आभार मानले. उपक्रमात सहभागी शाळांना व शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.