कोल्हापुरात डेंग्यूचे पाच हजार रुग्ण, महापालिका अधिकारी करतात काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST2021-09-09T04:29:09+5:302021-09-09T04:29:09+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून, पाच हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत असताना महानगरपालिका ...

कोल्हापुरात डेंग्यूचे पाच हजार रुग्ण, महापालिका अधिकारी करतात काय?
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून, पाच हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत असताना महानगरपालिका प्रशासन रुग्णांची आकडेवारी का लपवीत आहे, असा संतप्त सवाल बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारला.
शहरातील सर्वच भागांत डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण सापडत आहेत. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना महापालिका प्रशासन काहीच उपाययोजना करीत नसल्याचा आक्षेप यावेळी नोंदविण्यात आला. महापालिका प्रशासनाकडून डेंग्यू रुग्णांची संख्या कमी दाखविली जात आहे; परंतु खाजगी लॅबमधील रुग्णांची संख्या जास्त दाखविली जाते याकडे लक्ष वेधत डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने काय उपाययोजना केली आहे, अशी विचारणाही यावेळी करण्यात आली.
मागील दोन वर्षे शहरातील नागरिक कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराने ग्रासले आहेत. डेंग्यूसारख्या आजारावर नियंत्रण मिळविणे आपल्या हाती असतानाही महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे डेंग्यू रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसत असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला.
पाचशे रुग्णांची दिली माहिती -
माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी महानगरपालिकेकडे असलेल्या रुग्णांची संख्या आणि खासगी लॅबकडील माहिती अधिकाऱ्यांना दिली. ऑगस्ट महिन्यात महापालिकेकडे ७४ रुग्ण असल्याची नोंद आहे, तर याच महिन्यातील खासगी रुग्णालयातील रुग्णसंख्या ५११ इतकी होती, असे दिंडोर्ले यांनी सांगितले. खासगी लॅबकडून संकलित केलेली लेखी माहितीच त्यांनी अधिकाऱ्यांना सादर केली. शहरात ५८ लॅब आहेत. त्यामुळे ही रुग्णसंख्या किमान पाच हजारांपर्यंत असावी असा अंदाज त्यांनी बोलून दाखविला.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त देसाई, उपायुक्त निखिल मोरे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार उपस्थित होते. मनसेच्या शिष्टमंडळात राजू दिंडोर्ले यांच्यासह विजय करजगार, पांडुरंग सपाटे, दिलीप पाटील, नीलेश लाड, नीलेश धुमाळ, अनिल हळवे, रणजित वरेकर, चंद्रकांत सुगते यांचा समावेश होता.
फोटो क्रमांक - ०८०९२०२१-कोल-एमएनएस
ओळ - कोल्हापूर शहरात डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवा, या मागणीचे निवेदन बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना देण्यात आले.